‘हे बरं नव्हं’; साताऱ्यात पवारांचा उदयनराजेंना टोला

ncp leader sharad pawar
ncp leader sharad pawar

सातारा :  ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा दिल्लीच्या दरबारात अपमान झाला. त्यानंतर राजे त्या दरबारातून निघून गेले आणि आता? मी एवढचं म्हणेन हे बरं नव्हं,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप नेते उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शरद पवार आज, पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यात आले होते. उदयनराजेंविषयी पवार काय बोलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. पण, भाषणात पवार यांनी उदयनराजे भोसले यांचा उल्लेख न करता त्यांना लक्ष्य केले. तसेच आगामी निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून देण्याचे आवाहन उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

काय म्हणाले शरद पवार?
बाईक रॅलीद्वारे जोरदार शक्ती प्रदर्शनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना साताऱ्यात मेळावा झाला. त्यात पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. पण, आजचे राज्यकर्ते दुष्काळ आणि महापुराच्या संकटाकडे बघायला तयार नाहीत. दुसरीकडं ज्या किल्ल्यांवर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथं हॉटेल आणि बार उभं करण्याचं नियोजन हे सरकार करत आहे. त्या जागांविषयी सरकारला आत्मियताच नाही. एकेकाळी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल, असा शब्द त्यांनी दिला होता. पण, महाराज दिल्लीत गेल्यानंतर दरबारात त्यांना मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले. त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पण, राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला.’ यानंतर आणि आता? असा प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला. त्यावर ‘हे वागणं बरं नव्हं.’ असं म्हणत, पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला.

‘मी चुकलो जयंतरावांचं ऐकलं नाही’
उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता पवार यांनी जयंत पाटील यांचा सल्ला मी ऐकला नाही, अशी कबुली दिली ते म्हणाले, ‘जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचं कारण एवढच होतं की, तुम्हाला आम्हाला या गादीचा अभिमान आहे. महाराष्ट्र धर्म ज्यांनी शिकवला त्यांची ही गादी आहे. त्यामुळं काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. पण, मी चुकलो. मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण, वेगळा मार्ग  स्वीकारायचा हा त्यांचा अधिकार आहे.’

‘कोण म्हणतंय मी म्हातारा झालोय?’
महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना आलेले अनुभव पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले. ‘सध्या मी महाराष्ट्रात फिरत आहे. जाईल तिथं मी पाहतोय की, तरुणांन लाचारी पसंत नाही. हल्लीची राजवट पसंत नाही. सगळ्यांची अपेक्षा अशीच की, ताकद उभी केली पाहिजे. मला अनेक जण ८० वर्षांचा म्हणतात. कोणी वयस्कर झालेत म्हणतात. कुणी सांगितलं, मी वयस्कर झालो. काय पाहिलं तुम्ही माझ्यात? जर, १४-१६ काम करण्याची गरज असेल तर, २० तास काम करीन पण महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ देणार नाही.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com