गोहत्या बंदीने मटण महागले : रघुनाथ पाटील

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

सांगली येथील बाजार समितीलगतच्या कल्पतरू मंगल कार्यालयात ता. 12 डिसेंबरला शेतकरी परिषद आयोजित केली आहे. त्याबाबतची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सातारा : ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये द्या, दोन कारखान्यांतील अंतराची अट रद्द करा यासह विविध मागण्यांसाठी सांगली येथील शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद आयोजित केली आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीने किमान समान कार्यक्रमात संपूर्ण व सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्‍वासन दिले असून, त्यांनी यू टर्न घेतल्यास त्यांना घरी जावे लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी दिला.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
सांगली येथील बाजार समितीलगतच्या कल्पतरू मंगल कार्यालयात ता. 12 रोजी दुपारी एक ते सायंकाळी सहा यावेळेत शेतकरी परिषद आयोजित केली आहे. त्याबाबत माहिती देताना ते पत्रकार परिषदेत म्हणाले, ""सरकार बदलले तरी धोरण बदलत नाहीत. राज्यात आघाडी सरकार असून, या पक्षांनी जाहीरमान्यांत सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यांनी ती पूर्ण करावी. सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण होत आहे. आयात जास्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनांना भाव मिळत नाही. परिणामी त्यांना आत्महत्या करावी लागते.''

अवश्य वाचा :  आता या शेतकऱ्यांना आले अच्छे दिन 

आपत्ती निवारण कायद्यात दुष्काळ, महापुराचा समावेश करून जिरायत शेतीला एकरी 50 हजार रुपये, बागायत शेतीला एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी. गोवंद हत्या बंदी, वन्य जीव संरक्षण, पाळीव प्राण्यांशी निर्दयी वागणूक, आवश्‍यक वस्तू कायदा, भू संपादन, कमाल जमीन धारणा आदी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावीत. सरसकट सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून वीज बिलातून मुक्‍त करा. शेतकऱ्यांना बाजाराचे, तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. शेतीमालावरील निर्यात बंदी उठवा, शेतकऱ्यांना कार्बन क्रेडीटचे अनुदान मिळाले पाहिजे आदीसह विविध मागण्यांबाबत परिषदेत चर्चा होणार असून, त्यास राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते, शरद जोशी यांच्या विचाराने कार्यरत असणारे कार्यकर्ते येणार आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 

शेट्टींना शेतीतील कळत नाही 

राजू शेट्टींना कृषीमंत्री पद मिळण्याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""त्यांनी देशाचे कृषीमंत्री व्हावे. त्यांना शेतीतील काही कळत नाहीत. त्यांना कळत असते, तर शरद जोशी यांना त्यांनी सोडले नसते. शेतीतील न कळणारेच कृषीमंत्री होत असतात. केवळ सरकारची धोरणे पुढे नेण्याचे काम करतात.'' 

हेही वाचा : कोल्हापूरपेक्षा या गावात मटणाचा दर जादा 
 

गोहत्या बंदीने मटण महागले 

गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे कत्तलखाने बंद झाले. भाकड जनावरे शेतकऱ्यांच्या माथी पडली. शिकार बंदीमुळे शिवारात डुकरे, ससे, हरणे वाढली आहेत. चीनमध्ये झुरळापासून हत्तीपर्यंत सर्व फस्त होत आहे. तेथे प्राणीमित्र जन्माला आले तर त्यांची काय गत होईल? इकडे प्राणीमित्रच जास्त झालेत. सरकारच्या या कायद्यांमुळेच मटणाचे दर वाढले आहेत, असा आरोपही श्री. पाटील यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raghunath Patil Addressed To Media Satara About Farmers Conference To Be Held In Sangli