कोल्हापूरपेक्षा 'या' गावात मटणाचा दर जादा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

मटण आणि कांद्याचा दर वाढल्याने कुटुंबांचे आर्थिक नियोजन कोलमडू लागले आहे. अनेकांना आठवड्यावरून पंधरवड्यावर मटणाचा बेताचे नियोजन करावे लागत आहे. 

सातारा : लोकांच्या निकडीच्या प्रश्‍नावर आंदोलनात नेहमी पुढाकार घेतलेल्या कोल्हापूरकरांनी मटण दरवाढीच्या विरोधात आंदोलन करून नवा पायंडा पाडला आहे. परंतु, 540 रुपये प्रतिकिलो दरालाही कोल्हापूरकर विरोध करत असताना सातारकरांना मात्र, निपूटपणे 600 रुपये प्रतिकिलोने मटण खरेदी करावे लागत आहे. कोल्हापूरकरांप्रमाणे सातारकरांनीही संघटितपणे मटण दरवाढीबाबत भूमिका घेण्याची मागणी होत आहे. त्याचबरोबर प्रशासनानेही याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही होत आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 

मटण दरवाढ हा सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्याला कारणीभूत ठरत आहे, ते मटणाच्या तांबडा-पांढऱ्या रस्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या आंदोलनामुळे. कोल्हापूरमध्ये विक्रेत्यांनी मटणाचे दर वाढविल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मटण दरवाढ कृती समितीच्या माध्यमातून याबाबत आंदोलनाला सुरवात झाली. त्यातून शहर, शहर परिसर व ग्रामीण भागात मटणांच्या दरामध्ये असलेल्या मोठ्या तफावतीवर प्रश्‍न उपस्थित करण्यात आला.

त्याबरोबर विक्रेत्यांना आव्हान देण्यासाठी ग्राहकांचीच स्वतंत्र विक्री व्यवस्था उभारण्याचे प्रतिकात्मक प्रयत्नही झाले. त्यातून कमी किमतीमध्ये मटण देता येईल, हे दाखवून देण्याचा प्रयत्न कृती समितीच्या वतीने करण्यात आला. आंदोलनाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली. त्यानुसार विक्रेते व समितीच्या सदस्यांची बैठक झाली. त्यामध्ये मिश्र मटण 280 रुपये प्रतिकिलो तर, विनामिश्र मटण 450 रुपये किलोने विक्री करण्याची मागणी दरवाढ विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली. त्यावर एकमत न झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व दोन्ही गटांचे सदस्य यांची समिती नेमली आहे. त्यांना दराबाबत पाहणी करून निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. 

कोल्हापूरपेक्षा सातारकरांना माेजावा लागताे जादा दर

सातारकरांना तर, सध्या कोल्हापूरपेक्षा जास्त दराने मटणाची खरेदी करावी लागत आहे. शहरामध्ये मटणाचे दर सध्या 600 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. काही ठिकाणी काही वेळेला अडवून 600 पेक्षा जास्त रुपयांची मागणी केली जाते. त्यामुळे मटण खायचे की नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे. ग्रामीण भागात काही दिवसांपूर्वी 450 ते 480 रुपये प्रतिकिलो असणारा दर आता थेट 580 पर्यंत गेला आहे. शहरात झालेल्या वाढीचा ग्रामीण भागावरही परिणाम झालेला आहे. त्यामुळे मटण दरावर कोणी नियंत्रण ठेवणार की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

मटण हा जिल्ह्यातील बहुतांश कुटुंबांच्या आहारातील महत्त्वाचा भाग आहे. आठवड्याला खाणाऱ्या प्रत्येकाच्या घरात मटणाचा बेत ठरलेलाच असतो. त्याचे नियोजन "बजेट'मध्ये केलेलेच असते. मात्र, दरवाढीमुळे नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडू लागले आहे. अनेकांना आठवड्यावरून पंधरवड्यावर या बेताचे नियोजन करावे लागत आहे. 

हॉटलेमधील मटणाच्या पदार्थांचे वाढले दर

घरगुती बजेटबरोबरच मटणाच्या वाढत्या दराचा परिणाम हॉटलेमधील मटणाच्या पदार्थांवरही होत आहे. तेथेही दरवाढ झाली किंवा क्वांटिटीमध्ये फरक पडत आहे. त्यामुळे साताऱ्यातही कोल्हापूरप्रमाणे ग्राहकांनी पुढाकार घेऊन दर नियंत्रणात आणण्याची मागणी मटणप्रेमींकडून व्यक्त होत आहे. कोल्हापूरप्रमाणे साताऱ्यात याबाबत कोण पुढाकार घेतो, हे पाहावे लागणार आहे. 

आम्ही काेल्हापूरी मटण दरवाढीवर आमचा असाही ताेडगा

""शहर आणि ग्रामीण भागात वेगळे-वेगळे दर होते. परंतु, आता त्या दरातही फारशी तफावत राहिली नाही. 600 रुपये प्रतिकिलो हा दर खूपच जास्त होत आहे. मटण हा बहुतांश लोकांच्या बजेटमध्ये महत्त्वाचा घटक असतो. त्यामुळे त्याचे दर कमी होण्यासाठी ग्राहकांबरोबरच शासकीय स्तरावरही प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. विक्रेत्यांनीही यावर तोडगा काढला पाहिजे.'' 

नितीन शिंदे, ग्राहक, सातारा 

""या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बकऱ्यांचे उत्पादन व वजनावरही परिणाम झाला आहे. बाजारात आवक कमी असल्याचे बकऱ्यांचे दर वाढले आहेत. कांदा व इतर भाजीपाल्यावर जसा निसर्गाचा परिणाम झाला, तसाच तो बकऱ्यांच्या दरावरही झाला आहे. ग्राहकाला स्वस्तात मटण मिळावे, अशी आमचीही इच्छा आहे. बकरी कमी दरात मिळाली तर, मटणही कमी दरात देता येईल. आवक वाढल्यास दरही कमी होऊ शकतो. परंतु, सध्याच्या स्थितीत या दराने मटणविक्री करून आमच्या हातात फारसे काही मिळत नाही. आम्हीही अडचणीत आहे.'' 

फिरोज ऊर्फ पप्पू कुरेशी, महाराष्ट्र मटण शॉप, मार्केट यार्ड, सातारा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: With The Rise In The Prices Of Meat The Financial Planning Of The Families Has Started To Decline