‘जयंत पाटीलांना अमोल कोल्हेंचा आधार’; इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांचा टोला

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत. त्यांना अमोल कोल्हेच्या क्रेझचा आधार घ्यावा लागत आहे, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

इस्लामपूर : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाषणाला पाच लोकही थांबत नाहीत. त्यांना अमोल कोल्हेच्या क्रेझचा आधार घ्यावा लागत आहे. आमच्या महाजनादेश यात्रेलामैदाने पुरत नाहीत आणि राष्ट्रवादीच्या यात्रेला छोटी मंगल कार्यालयेदेखील भरत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आज इस्लामपूर येथे भाजपाच्या महाजनादेश यात्रेनिमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

शरद पवार यांच्या ‘पाकिस्तान’ वक्तव्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जयंत पाटील यांचे भाषण सुरू झाल्यावर लोक थांबत नाहीत. जयंत पाटलांना अमोल कोल्हेच्या आधी भाषण करावे लागते. कोल्हेंना पाहण्यासाठी कार्यकर्ते गर्दी करतात. विरोधी पक्षांचा जनाधार कमी झाला आहे. त्यांची ईव्हीएम विषयीची ओरड म्हणजे वर्गातील बुद्धू पोरगा परीक्षेला बसल्यावर चुकीची उत्तरे लिहितो, नापास होतो व नापास का झालास असे वडिलांनी विचारल्यावर माझा पेन नालायक निघाला, नाहीतर मी मेरिटमध्येच आलो असतो याप्रमाणे बालिश उत्तर देणाऱ्या राज्यातील विरोधकांची अवस्था झाली आहे. येत्या विधानसभेचा निकाल पक्का आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पैलवानांना चितपट करायचं जनतेच्या मनात ठरलंय. त्यांच्यात भाजप महायुतीच्या विरोधात उभारायला कुणी तयार नाही, आमचे पैलवान मात्र तेल लावून तयार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच केलेल्या कामाचा आढावा घेऊन आमचे सरकार जनतेत जात आहे. प्रत्येकाच्या मनात मोदी आहेत, त्यामुळे आमचे सरकार सत्तेत आहे. गेल्या पंधरा वर्षांत त्यांनी जे केले नाही ते आम्ही गेल्या पाच वर्षांत केले. शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटींची मदत दिली. त्यांनी १५ वर्षांत केवळ २० हजार कोटी दिले होते. १८०० गावांत पाणी योजना केल्या. उद्योग, रोजगार, शिक्षण, गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. इस्लामपूर शहराला सर्वाधिक निधी दिला, यापुढेही देऊ.’

सांगली : शिराळ्यात ताकद वाढली; सत्यजित देशमुख भाजपमध्ये

ते म्हणाले, ‘महापुरात मदतीचा त्यांचा आणि आमचा आकडा काढला तर ८० पट जास्त मदत आम्ही दिली आहे. यापुढच्या काळात नुकसान होऊ नये यासाठी व्यवस्थाच बदलणार आहोत. जागतिक बँकेच्या मदतीने आम्ही महापुराचे वाया जाणारे पाणी जत, आटपाडी व माण या दुष्काळी तालुक्यात वळवणार आहोत. यावर काम सुरू आहे. पुढच्या तीनचार वर्षात कितीही पाऊस पडला तरी कसलेही नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतली आहे.पाच वर्षात पारदर्शी काम करून आशीर्वाद मागायला आलो आहे. विधानसभेवर पुन्हा एकदा भाजप महायुतीचा झेंडा फडकवू.’ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, मंत्री सुरेश खाडे, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार निरंजन डावखरे, भगवानराव साळुंखे, तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील, विक्रम पाटील, शिवाजी पवार, धैर्यशील मोरे प्रमुख उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan sabha 2019 cm devendra fadnavis statement against ncp leader jayant patil islampur sangli