हॉटेलिंग महागणार? दरवाढीचा दणका; व्यवसायाची कोंडी

Will hoteling be expensive? Price hike; Business in dilemma
Will hoteling be expensive? Price hike; Business in dilemma
Updated on

सांगली ः कोरोना संकट काळात सहा महिन्यांहून अधिक काळ टाळेबंदी लागलेला हॉटेल व्यवसाय पुन्हा एकदा चक्रव्युहात सापडला आहे. गॅस सिलिंडर, खाद्यतेल, भाजीपाला, आटा, कोळसा सारेच महाग झाले आहे. त्यात कामगारांची पगारवाढ, ग्राहकांची रोडावलेली संख्या यामुळे सारे गणित बिघडले आहे. या स्थितीत दरवाढीशिवाय पर्याय उरलेला नाही, यावर हॉटेल व्यावसायिकांचे एकमत आहे. त्याबाबत आठवडाभरात बैठक होणार असून, एप्रिलपासून हॉटेलिंग महागणार हे स्पष्ट आहे. 


सांगली जिल्हा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष लहू भडेकर यांनी हॉटेल व्यवसाय अडचणीत येण्यास महागाईबरोबरच शासकीय कर आकारणीचे असमान धोरणही कारणीभूत असल्याची टीका "सकाळ'शी बोलताना केली. प्रामाणिकपणे हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांच्या डोक्‍यावर करांचा बोजा आहे, त्यांना वेळाचे बंधन आहे, जे गल्लीबोळात खानावळी, नाष्टा सेंटर उघडून बसले आहेत, त्यांना कसलाच कर नाही. तेथे दर कमी ठेवून व्यवसाय सुरू आहे, अशा स्पर्धेला कसे सामोरे जायचे. महापालिकेने दाखल्यासाठी पाच-पाच हजार रुपये आकारणी सुरू केली आहे, कुठून आणायचे पैसे, असा जाहीर सवालही त्यांनी केला. 


सध्या गॅस सिलिंडर, तेल, मसाल्याचे पदार्थ सारे महाग झाले आहे. त्यात भर म्हणजे सर्वाधिक चालणारी रोटी आता महागणार आहे, कारण आट्याचे दर दीड हजार रुपये पोत्यावरून दोन हजार ते 2200 रुपये झाले आहेत. भट्टीचा कोळसा महागला आहे. कांदा दर सध्या मर्यादित असला, तरी त्याचा कधीही भडका उडतो. खाद्यतेलाच्या दरात 40 टक्के वाढ आहे, या साऱ्याचे बजेट काढून नवे दर ठरवले जातील, असे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. दरवाढ केली तर ग्राहक तुटतील का, याचीही चिंता व्यावसायिकांना आहे. 


गॅस, तेलाने डोळ्यात पाणी 
व्यावसायिक वापराच्या गॅस सिंलिंडरची (19 किलो) किंमत 1600 रुपयांवर पोचली आहे. ही वाढ डोकेदुखी ठरत आहे. खाद्यतेलाच्या दरात सरासरी 40 टक्के वाढ झाली आहे. सूर्यफुल तेल 160 रुपयांवर पोचले आहे. मटणाचा दरही वाढून 600 रुपयांवर स्थिरावला आहे. चिकन दर 160 रुपयांपर्यंत कमी झाला होता, तो पुन्हा 200 रुपये किलो झाला आहे. ग्रेव्हीसाठी लागणारे कांदा, टोमॅटो आटोक्‍यात आहेत, हीच जमेची बाजू आहे. 


हॉटेल व्यवसायावरचे परिणाम 

  • कोरोना संकटात सहा महिने व्यवसाय ठप्प 
  • कोकणी, उत्तर भारतीय कामगार झाले बेरोजगार 
  • पुन्हा प्रारंभानंतर जेमतेम प्रतिसाद 
  • कामगारांची पगारवाढ 
  • गल्लीबोळात व्यवसाय विस्तारला, ग्राहक संख्या स्थिर 

व्यवसाय संकटात आहे. 

या आठवड्यात हॉटेल संघटनेची बैठक घेणार आहोत. दराबाबत धोरण ठरवावे लागेल. कारण, सध्या कर प्रणाली, महागाईत गणित बिघडून गेले आहे. कोरोना संकट पुन्हा येण्याची भीती असल्याने निर्बंधांची चिंता आहेच. त्यामुळे काय करावे, कसा मार्ग काढावा, सगळा गोंधळ उडाला आहे. त्यातून मार्ग काढावा लागेल, व्यवसाय संकटात आहे. 
- लहू भडेकर, अध्यक्ष, जिल्हा हॉटेल मालक संघटना 

दर तसेच ठेवावेत तर गणित बसत नाही
गॅस सिलिंडर आणि खाद्यतेल हा हॉटेल व्यवसायाच्या दर निश्‍चितीचा पाया ठरतो. त्यातच प्रचंड वाढ झाल्याने या व्यवसायाची कुचंबणा सुरू झाली आहे. दरवाढ करावी तर आधीच ग्राहकांची संख्या रोडावली आहे; दर तसेच ठेवावेत तर गणित बसत नाही. करायचे काय? थाळी सिस्टीमवाल्यांची तर मोठीच अडचण झाली आहे. 
- दिनेश सन्मुख, हॉटेल साईप्रसाद, सांगली 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com