पुण्यात लॉकडाउनचा कालावधी वाढविणार नाही : जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा 

सरकारनामा ब्युरो
Monday, 20 July 2020

राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा गेल्या महिनाभराच्या कालावधीत सर्वाधिक रूग्ण पुण्यात वाढले आहेत.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सध्या लागू करण्यात आलेले लॉकडाऊन वाढविण्यात येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज दिली. या लॉकडाऊनमुळे नागरीकांना त्रास झाला असला तरी वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमुळे लॉकडाऊन आवश्‍यक होते, असे राम यांनी स्पष्ट केले. 

पत्रकारांशी बोलतना राम म्हणाले,"" सलगपणे लॉकडाऊन न करता कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण आणण्याचे कठीण काम यापुढे पार पाडावे लागणार असून त्यासाठी आठवड्यातून एख दिवस लॉकडाऊन करण्याचा विचार आहे. आठवड्यातून एकदा बंद पाळणे, प्रतिबंधित क्षेत्रात निर्बंध घालणे, रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध करून देणे तसेच मोठ्या प्रमाणात कोविड सेंटर उभी करून कोरोच्या संसर्गावर नियंत्रण आणावे लागणार आहे. यासाठी प्रशासनाला नागरीकांच्या सहकार्याची गरज आहे. पुणेकरांनी सहकार्य केल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण शक्‍य नाही. 

यापुढील काळात केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांन नागरीकांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

 राम म्हणाले, "" पुणे शहरात जुलै महिन्यात खूपच वेगाने रुग्ण वाढू लागल्याचे निदर्शनास आले. यामुळे या रुग्ण वाढीवर नियंत्रण आणणे आवश्‍यक होते. यासाठी तातडीने दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला. यापैकी पहिले पाच दिवस कडक लॉकडाउन करण्यात आला. त्यानंतरच्या पाच दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये थोडीही शिथिलता दिली आहे. हा कालावधी येत्या 23 जुलैला संपत आहे. त्यांनतर सध्याच्या लॉकडाउनचा कालावधी वाढविला जाणार नाही." 

पुण्यात गेल्या 35 दिवसात कोरोना रूग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. वाढीचा हा वेग अजूनही सुरूच असून संसर्गावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून मोठ्या संख्येने तपासण्या व कोविड सेंटरची उभारणी ही या काळातील महत्वाच्या उपाययोजना असतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा गेल्या महिनाभराच्या कालावधीत सर्वाधिक रूग्ण पुण्यात वाढले आहेत. रूग्ण वाढीचा हा वेग पुण्यातच कशामुळे होता याचाही अभ्यास करण्यात येत असल्याचे या अधिकाऱ्यांने सांगितले.

ऑगस्ट महिना कोरोना संसंर्गाच्या दृष्टीने आव्हानाचा असून या काळात अधिक काटेकोर उपाययोजनांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील महिन्यात वाढणारी रूग्णसंख्या लक्षात घेऊन तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे त्याचा अभ्यास करण्यात येत असल्याचे या आधिकाऱ्यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown period in Pune will not be extended: District Collector's announcement