Vidhan Sabha 2019 : 'पुन्हा एकदा मोदी विरुद्ध पवार!

modi-and-pawar.jpg
modi-and-pawar.jpg

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्रात एकमेव सक्षम विरोधी पक्ष उरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तीनही सभांसाठी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांची निवड केली. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच राज्यात पुन्हा एकदा पवार-मोदी असाच सामना रंगला असून, मोदी अस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी पवार शेवटच्या एका दिवसात कोणती चाल खेळणार याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बहुतेक दिग्गज पक्षात आणून या पक्षांना जबर धक्का दिला. राज्यात या आधी कधीही एवढ्या मोठ्याप्रमाणावर पक्षांतर झाले नव्हते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक गाजली ही पक्षांतरामुळेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चोहोबाजूंनी खिळखिळे केले असतानाच शरद पवार यांनी मात्र एकांडी शिलेदाराप्रमाणे राष्ट्रवादीचा किल्ला लढविला आहे. पक्षांतरानंतरही पवार यांनी राज्यभर फिरून पक्षाच्या दुसऱ्या फळीला जागे केले. त्यामुळे भाजपसमोर आता राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस हाच प्रबळ विरोधक उरला आहे. राष्ट्रवादीला नामोहरम करण्यासाठी भाजपनेही प्रचाराची रणनीती आखली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी (ता. 17) होणाऱ्या तीनही सभा या राष्ट्रवादीचे प्राबल्य असणाऱ्या भागात घेऊन भाजपने एक प्रकारे हा संदेशच दिला आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांनी दिलेला राजीनामा आणि भाजपमध्ये केलेला प्रवेश पवार यांच्या जिव्हारी लागला आहे. सुरुवातील आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि काही दिवसांतच उदयनराजे यांचा भाजप प्रवेश राष्ट्रवादीला हादरा देणारा ठरला. त्यामुळे पवार यांनी तातडीने सातारा येथे जाऊन 'डॅमेज कंट्रोल'चा प्रयत्न केला. साताऱ्यातील पवार यांच्या दौऱ्यास मिळालेला प्रतिसाद भाजपला अनपेक्षित होता. त्यामुळेच पोटनिवडणुकीत उदयनराजे यांना विजयी करण्यासाठी भाजपला आपली सर्व ताकद पणाला लावावी लागली आहे. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे उदयनराजे यांना ही पोटनिवडणूक वाटते तेवढी सोपी नाही. छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वंशज भाजपमध्ये आले हे मोदी यांच्यासाठी प्रतिष्ठेची बाब आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्याबाबत कोणताही धोका पत्करण्यास भाजप तयार नाही. यासाठीच मोदींची साताऱ्याला सभा ठरली. साताऱ्याची सभा हे राष्ट्रवादीला आव्हान देण्यासाठीच होते. एकदा सातारा जिल्हा ताब्यात आला की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात फारसे काही उरत नाही, हे भाजपला माहिती आहे. साताऱ्याचे उदयनराजे, कोल्हापूरचे संभाजीराजे भाजपसोबत आले. लोकमान्य टिळकांच्या घरातील पुण्याच्या महापौर मुक्‍ता टिळक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची आदराची स्थाने, प्रतिके भाजपने आपल्याकडे ओढली आहेत. त्यांची काळजी घेणे अर्थातच पक्षाचे नैतिक कर्तव्य बनले आहे.

परळीत आज मोदींची सभा 

मोदी यांची आज सकाळी परळी (बीड) मध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. कालच या ठिकाणी शरद पवार यांची सभा झाली होती. बीडमध्ये धनंजय मुंडे यांचा प्रभाव आहे. राष्ट्रवादीचे प्रभावी नेते म्हणून मुंडे गेल्या पाच वर्षात समोर आले आहेत. याठिकाणीही राष्ट्रवादीचा प्रभाव कमी करण्यासाठीच मोदींच्या सभेसाठी ठिकाण निवडण्यात आले आहे. या सभेत मोदींनी थेट शरद पवार यांचा लक्ष करीत तुमचे लोक पक्ष सोडून का जात आहेत, याचा आधी विचार करा, असा टोला मारला आहे.

पुण्यात आज मोदींची सभा

मोदींची शेवटची सभा पुण्यात एस. पी. कॉलेजच्या मैदानावर होत आहे. सभा जरी पुण्यात होत असली तरी पुणे जिल्हा आजही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ओळखला जातो. देशभरात मोदी लाट असतानाही बारामती आणि शिरूर या लोकसभेच्या दोन जागा राष्ट्रवादीने आपल्याकडे राखल्या. पुण्यात भाजपला शतप्रतिशत अनुकूल वातावरण आहे. पण मोदी यांना पुण्यात येऊन शरद पवार यांनाच 'टार्गेट' करायचे हे वेगळे सांगायला नको. पुण्यातील आठही जागा भाजपकडे आहेत. पुण्यात पाच जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस तर तीन जागांवर काँग्रेस भाजपचा सामना करीत आहे. पुण्यातील सभेसाठी भाजप-शिवसेनेने संपूर्ण जिल्ह्यातून ताकद लावली आहे. याशिवाय पुण्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे निवडणूक लढवीत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊनच मोदी यांच्या पुण्यातील सभेकडे सर्वांचे लक्ष आहे.

राष्ट्रवादीच्या मुळावर घाव घालण्यासाठी पुणे, सातारा, बीडला भाजपला मोठे यश हवे आहे. या यशावर मोहोर उमटविण्यासाठी मोदी अस्त्राचा मारा या तीन ठिकाणी करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला सावरण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधीच उरणार आहे, त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूकही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी त्याहीपेक्षा पवार विरुद्ध मोदी अशीच रंगली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com