कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

पुणे  -  नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सूम) संपूर्ण राज्य व्यापल्यानंतर कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या सरीवर सरी बरसू लागल्या आहेत. कोकण, उत्तर महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यातर्फे रविवारी देण्यात आला. विदर्भात पावसाचा जोर वाढणार असून, उर्वरित राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 

कोकणासह मध्य महाराष्ट्रात शनिवारी सायंकाळनंतर पावसाला सुरवात झाली. जोरदार सरींनी उत्तर कोकणालाही झोडपून काढले. मुंबईसह, पालघर, ठाणे जिल्ह्यात सर्वत्र, तर नाशिक, पुणे, नगर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात दमदार पाऊस पडला. घाटमाथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला असून, धरणाच्या पाणलोटातील नद्या वाहू लागल्या आहेत, अशी माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात पाऊस पडला. खेड तालुक्‍यातील कलमोडी, चासकमान, मावळातील वडीवळे धरणाच्या क्षेत्रात जोर अधिक होता. खडकवासला, टेमघर, वरसगाव, पानशेत धरणातही पावसाने हजेरी लावली. दुपारनंतरही या भागात पाऊस पडत होता. पूर्व भागातील वीर, नाझरे, उजनी, घोड आणि विसापूर धरणांच्या परिसरात पावसाची नोंद झालेली नाही. 

ढगाळ वातावरण; रस्तेही रिकामे 
शहरात रविवारी दिवसभर सूर्याचे दर्शन दुर्लभ झाले होते. त्यातच शहराच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या सरी पडत होत्या. सुटीची पर्वणी साधत नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले. त्यामुळे महात्मा फुले भाजी मंडईमधील विक्रेत्यांना प्लॅस्टिक कागदाचा आधार घेऊन ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली. वाहतूक कोंडी होणारे रस्तेही रिकामे दिसत होते. मुळा-मुठा नदी पुलांवरही गर्दी तुलनेने कमी होती. पावसाळी वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे चहाच्या टपऱ्यांवर आणि छत्री दुरूस्ती करणाऱ्या कारागिराजवळ मात्र ग्राहकांची गर्दी होती. 

Web Title: maharashtra news heavy rain