शेती, शिक्षण, उद्यमशीलता विकासाचा निर्धार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

‘सकाळ’च्या पुढाकाराने एकवटले राज्यभरातील समविचारी घटक

‘सकाळ’च्या पुढाकाराने एकवटले राज्यभरातील समविचारी घटक
पुणे - सर्व समाजाच्या केंद्रस्थानी असलेल्या आणि मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने पुढे आलेल्या शेती, शिक्षण आणि उद्यमशीलतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने गुरुवारी एक पाऊल पुढे टाकले. मराठा मोर्चांचे राज्याच्या विविध भागांतील संघटक आणि सर्व समाजांच्या प्रगतिशील समविचारी प्रतिनिधींची राज्यव्यापी बैठक पुण्यात घेऊन आता फक्त प्रश्नच नव्हे, तर उत्तरेही आम्हीच शोधणार, असा निर्धार सर्व उपस्थितांनी केला. मराठा मोर्चांच्या निमित्ताने शेती आणि उद्योगातील संधींचे मुद्दे पुढे आणले आहेत, त्यावर पहिल्यांदाच उत्तरे देऊ शकणारे ठोस मंथन झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. 

मोर्चाच्या निमित्ताने अनेक बाबींवर चर्चा सुरू झाली असली तरी, शेती, शिक्षण आणि उद्यमशीलता विकास या मुद्द्यांकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याची अधिक गरज आहे. नेमकेपणाने यावर उत्तरे शोधणारा कार्यक्रम ‘सकाळ’ने घेतल्याचे अनेकांनी सांगितले. राजकीय नेतृत्वासह माध्यमांनीही शेती आणि उद्योग रोजगारविषयीच्या मुद्द्यांकडे पुरेसे लक्ष दिले नसल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले. या तीनही मुद्द्यांवर ‘सकाळ’ने सर्व समाज घटकांच्या सहभागाने कृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. महाराष्ट्रात स्मार्ट व्हिलेज निर्माण करण्याची आणि त्याद्वारे शेती तसेच उद्यमशीलता-कौशल्य विकास आणि शैक्षणिक प्रगतीची संकल्पना ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी मांडली. या संकल्पनेत सक्रिय सहभागाची तयारी उपस्थितांपैकी अनेकांनी दर्शविली. शेतीचे प्रश्न सर्व समाजाचे प्रश्न आहेत आणि तिथे शेतकरी हीच एक जात आहे. त्यावर सर्वांच्या सहभागातून सर्वांसाठी उपाय योजले पाहिजेत, यावरही उपस्थित संघटकांनी सहमती दर्शवली. 

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, राजेंद्र कोंढरे, प्रवीण गायकवाड यांच्यासह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. ‘सकाळ’च्या वतीने मुख्य संपादक श्रीराम पवार, संचालक (तंत्रज्ञान) भाऊसाहेब पाटील, ‘सकाळ’चे स्ट्रॅटेजिक हेड बॉबी निंबाळकर, संपादक मल्हार अरणकल्ले, कार्यकारी संपादक नंदकुमार सुतार आदींचा बैठकीत सहभाग होता. 

सुरवातीस ‘सामूहिक विकासासाठीचा शाश्‍वत दृष्टिकोन’ या विषयावर अभिजित पवार यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून संवाद साधला. बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव आणि निधीची कमतरता हे प्रश्‍न एकूणच जगभरातच आहेत. ते सोडविण्यासाठी ‘तनिष्का’, ‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. आपण सर्व जण एकत्र आलो, तर जगासाठी एक आदर्श मॉडेल निर्माण करू शकू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला; परंतु त्याच वेळी सर्व घटकांना एकत्रित करून सर्वसहमती घडवून आणणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘सर्वच जाती-धर्मांतील तरुणांमध्ये कौशल्यनिर्मिती करून कार्यक्षमता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी नागरिक, राज्यकर्ते, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, स्वयंसेवी संघटना आणि वित्त पुरवठा करणारे घटक यांना एकत्र करावे लागणार आहे. सर्व समाज घटकांचा सहभागही यात आवश्‍यक आहे. त्यासाठी सखोल नियोजनाला सर्वंकष अंमलबजावणीची जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सकाळ’ने आपल्यापरीने प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नाला सर्वांची जोड मिळाली, तर कोणापुढे हात पसरण्याची गरज पडणार नाही.’’

श्रीराम पवार यांनी प्रास्ताविकात बैठकीमागची भूमिका सांगितली. ते म्हणाले की, अनेक अर्थांनी ऐतिहासिक असे मराठा क्रांती मोर्चे निघत असताना हे आंदोलन कोणाचाही द्वेष करत नाहीत आणि कोणत्याही नेत्याविना व्यापक समाज सहभागातून चालले आहे. या वैशिष्ट्यांची नोंद घेतानाच आंदोलनातील मागण्यांमागचे सूत्र विकासाच्या लढाईत मागे पडू नये हेच आहे. त्याला प्रतिसाद द्यायचा तर शेतीचा विकास आणि उद्यमशीलतेची कास धरली पाहिजे, हे सर्वच समाजाचे प्रश्न आहेत, यावरच मंथन करण्यासाठी बैठक आयोजित केली. 

‘सकाळ ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पनेचे उपस्थितांसमोर प्रत्यक्ष सादरीकरण केले. यामध्ये गावांची निवड करण्यापासून तेथील लोकसहभाग आणि तेथे राबवित असलेल्या वेगवेगळ्या प्रकल्पांची माहिती दिली. आतापर्यंत शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक व्हायला पाहिजे होती; परंतु शेतीतील गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे शेती मागे राहिली. यामध्ये बदल करण्याची क्षमता स्मार्ट व्हिलेजमध्ये आहे, असे त्यांनी नमूद केले.

नाशिक येथील ‘शेतकरी उद्योजक’ विलास शिंदे यांनी बेरोजगार तरुण ते ‘सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी’ या द्राक्ष निर्यात करणाऱ्या जगातील अग्रगण्य शेतकरी कंपन्यांच्या स्थापनेचा प्रेरणादायी प्रवास उलगडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कर्तृत्वाला दाद दिली. ‘आपले प्रश्‍न आपणच सोडवू शकतो; परंतु त्यासाठी स्वतःची ताकद वाढविणे आवश्‍यक आहे,’ असा मंत्र त्यांनी अनुभवाच्या आधारे दिला. यापुढील प्रवासात तुम्ही पुढे आल्यास त्याला विनामूल्य साथ देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली. एकेकाळी त्यांना दरमहा तब्बल चार टक्के दराने म्हणजे वर्षाला ४८ टक्के दराने कर्ज घ्यावे लागत होते; परंतु ताकद आल्यानंतर वार्षिक अवघ्या दोन टक्के दराने कर्ज देण्यासाठी बॅंकाच कशा स्वतःहून पायघड्या घालू लागल्या, याचा अनुभवही त्यांनी सांगितला. याच जोरावर त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल आज अडीचशे कोटींवर गेल्याचे शिंदे यांनी सांगितले. पारदर्शक कारभारातून कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, भांडवल आणि बाजाराची सोय उपलब्ध करून दिल्यामुळे हे शक्‍य झाल्याचेही त्यांनी नमूद केले. 

शिंदे यांच्या या कार्याची दखल घेत उपस्थित अनेक प्रतिनिधींनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टींबाबत मार्गदर्शन घेतले. उद्योग, आर्थिक- गुंतवणूकविषयक तज्ज्ञ, शिक्षण आणि कौशल्य विकास क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच डॉक्‍टर, अभियंते, वकील शेतीविकासत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी घटकही बैठकीत सहभागी झाले होते.

ॲड. एस. के. जैन (पुणे), विकास पासलकर (पुणे), सूर्यकांत काळे (सातारा), संदीप पोळ (सातारा), सुरेश भामरे (नाशिक), चंद्रकांत बनकर (नाशिक), शैलेश कुटे (नाशिक), डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण (जळगाव), रणजित पाटील (सांगली), संदीप विचारे (मुंबई), विनोद भोसले (सोलापूर), सतीश भोसले (ठाणे), सचिन सावंत-देसाई (नवी मुंबई), सुधीर भोसले (चिपळूण), सुहास मेरुणकर (रायगड), अजित साळवी (चिपळूण), किशोर फड (नवी मुंबई), हरिश्चंद्र देसाई (लांजा), डॉ. प्रदीप तुपेरे (नगर), गुरुप्रसाद देसाई (पुणे), डॉ. संजय कळमकर (नगर), राजेंद्र काळे (नगर), मिथिलेश देसाई (रत्नागिरी), सुभाष तांबोळी (पुणे), शरद सानप (सिन्नर), शरदचंद्र घुले (सिन्नर), प्रभाकर धामक (नाशिक), उमेश तांदळे (पुणे), अर्जुन पवार (औरंगाबाद), अनिकेत देशमुख (अमरावती), डॉ. अभय पाटील (अकोला), निखिल पाटील (अकोला), मनोज मोरे (धुळे), योगेश थोरात (धुळे), अनिल पवार (धुळे), अमित मारणे (पुणे), ॲड. शिवराज कदम (पुणे), केतन खिवंसरा (पुणे), सुनील बिजलगावे (नांदेड), बाळासाहेब ठाकरे (नरखेड), डॉ. सुजित लहानकर (नांदेड), प्रसाद कऱ्हाडकर (चिंचवड), प्रा. डी. डी. बच्छाव (जळगाव), मानसिंग पवार (औरंगाबाद), सदानंद देशपांडे (पुणे), विश्वेश कुलकर्णी (पुणे), प्रा. चंद्रकांत भराट (औरंगाबाद), विजय मुधोळ (हिंगोली), सुरेशदादा पाटील (कोल्हापूर), आबा (विजय) पाटील (पिंपरी-चिंचवड), सुभाष जावळे (परभणी), गणी आजरेकर (कोल्हापूर), संजय काटकर (औरंगाबाद), कोंडाजीमामा आव्हाड (नाशिक), कुंदन सोनवणे पाटील (नंदुरबार), जितेंद्र पाटील (नंदुरबार), डॉ. बाळासाहेब पवार (नगर), मनीष पवार (औरंगाबाद), विजयकुमार शिंदे (नागपूर), गिरीश जाधव (नांदेड) हे या बैठकीला उपस्थित होते.

‘सकाळ माध्यम समूहा’चे कौतुक 
‘स्मार्ट व्हिलेज’ प्रकल्प राबविण्यास पुढाकार घेतल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे सर्वच प्रतिनिधींनी कौतुक केले. औपचारिक बैठक संपल्यानंतरही   ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्यासोबत अनेक प्रतिनिधी चर्चा करत होते. बैठक सुरू असतानाच अनेक प्रतिनिधींनी ‘सकाळ’सोबत काम करण्याची तयारी दर्शविली. यामध्ये कोकणापासून विदर्भापर्यंत राज्याच्या सर्वच भागांतील प्रतिनिधींचा समावेश होता.

समाजातील पाच टक्के संपन्न वर्गाने उर्वरित समाज घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असे घडले तरच समाजात अपेक्षित बदल घडून येतील. 
- अभिजित पवार, व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह

केवळ समस्यांचा पाढा वाचून चालणार नाही. आपले प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ताकद वाढविली पाहिजे. 
- विलास शिंदे, संस्थापक, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी

Web Title: maratha kranti morcha meeting with sakal