कोकण, मध्य महाराष्ट्रात मॉन्सून दाखल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जून 2016

पुणे - कोकण-गोव्यामार्गे राज्यात "एंट्री‘ करणाऱ्या मॉन्सूनने यंदा विदर्भातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आज (रविवार) मॉन्सून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात दाखल झाला. मॉन्सूनने पूर्ण विदर्भ व्यापला असून, याठिकाणी पाऊस पडत आहे.

पुणे - कोकण-गोव्यामार्गे राज्यात "एंट्री‘ करणाऱ्या मॉन्सूनने यंदा विदर्भातून महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर आज (रविवार) मॉन्सून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिण भागात दाखल झाला. मॉन्सूनने पूर्ण विदर्भ व्यापला असून, याठिकाणी पाऊस पडत आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळिराजाला यामुळे दिलासा मिळाला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, उत्तर कर्नाटक, तेलंगण, विदर्भाचा उर्वरित भाग आणि झारखंडमध्ये नैर्ऋत्य मोसमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पश्‍चिम बंगालचा उर्वरित भाग, ओडिशा, तेलंगणपर्यंत मॉन्सूनने आगेकूच केली आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे केरळात दाखल झाल्यानंतर तमिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर गेल्या काही दिवसांपासून रेंगाळले होते. तळकोकणातून मॉन्सून लवकरच राज्यात प्रवेश करील, अशी आशा व्यक्त केली जात होती. दरवर्षी कोकणातून मॉन्सून दाखल होतो; मात्र शुक्रवारी रात्री विदर्भामार्गे तो राज्यात दाखल झाला. साधारणतः 10 जूनपर्यंत बहुतांश महाराष्ट्र व्यापणारा मॉन्सून यंदा 18 जूनपर्यंत तळकोकणाच्या उंबरठ्यावरच होता. पूर्व विदर्भाच्या दक्षिण भागात मॉन्सून सर्वसाधारपणे 10 जूनपर्यंत दाखल होतो. त्याचवेळी तो कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापतो. यंदा मात्र बंगालच्या उपसागरात अनुकूल वातावरण असल्याने त्याने विदर्भाच्या पूर्व भागापर्यंत मजल मारली आहे. 

राज्यात 2007 मध्ये पूर्व आणि पश्‍चिम भागात म्हणजेच कोकण आणि विदर्भात एकाच वेळी मॉन्सून दाखल झाल्याची नोंद आहे. यापूर्वी 2014 मध्ये सगळ्यात उशिरा म्हणजे 11 जूनला मॉन्सून राज्यात दाखल झाला होता. आता मॉन्सूनने हेही रेकॉर्ड मोडले आहे. 

अरबी समुद्रापेक्षा पश्‍चिम बंगालच्या उपसागरातून मान्सूनची शाखा अधिक वेगाने पुढे सरकली आहे. बंगालच्या उपसागरात छत्तीसगड, ओडिशा, उत्तर राजस्थान ते मध्य प्रदेश, छत्तीसगड व ओडिशादरम्यान हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातून मॉन्सूनने आगेकूच केली आहे. दरम्यान, येत्या काही तासांत गोवा, कोकण आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने वर्तवला आहे. 

मॉन्सूनचे राज्यातील आगमन :- 
वर्ष तारीख 
2011 : 3 जून 
2012 : 6 जून 
2013 : 4 जून 
2014 : 11 जून 
2015 : 8 जून 

पुण्यात पावसाची शक्‍यता 
पुण्यात येत्या दोन दिवसांत अधून-मधून पावसाच्या सरी पडतील. तसेच कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार, तर मध्य-महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवारी (ता.19) मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सिंहगड, कोथरूड, कर्वेनगर येथे पावसाचा शिडकाव झाला. 

Web Title: monsoon reaches konkan