पवार कुटुंबात सध्या कोण, काय करतंय?

टीम ई-सकाळ
Sunday, 29 September 2019

शरद पवार यांच्या कुटुंबाभोवती असणारं वलय काही कमी झालेलं नाही आणि भविष्यात ते होणारही नाही, असं दिसतंय.

Sharad Pawar Family : महाराष्ट्राचं राजकारण आजही दोन कुटुंबांच्या भोवती फिरतं. पवार आणि ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या अवस्थेवर कोणी कितीही टीका केली तरी, पवार कुटुंबाभोवती असणारं वलय काही कमी झालेलं नाही आणि भविष्यात ते होणारही नाही, असं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पवार कुटुंबात गृहकलह असल्याची चर्चा सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबात सध्या कोण काय करतंय. याची माहिती घेऊयात.

आईकडून राजकारणाचा वारसा
शरद पवार हेच पवार कुटुंबातील पहिले राजकारणी आहेत, असा अनेकांचा समज आहे. पण, शरद पवार यांच्या आई या शेतकरी कामगार पक्षाच्या सक्रीय नेत्या होत्या. शरद पवार यांना राजकारणाचं बाळकडू आई शारदाबाई यांच्याकडूनच मिळालं. गोविंद पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण ११ मुलं. ७ मुलं आणि ४ मुली. त्यातले फक्त शरद पवारच राजकारणात सक्रिय उतरले. बाकीच्यांनी शेती, वकिली, शिक्षण, उद्योग अशा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात शिखर गाठलं.

गोविंदराव आणि शारदाबाईंची मुले क्रमाने अशी,

 1. वसंतराव
 2. दिनकरराव (आप्पासाहेब)
 3. अनंतराव
 4. माधवराव (बापूसाहेब)
 5. सूर्यकांत
 6. सरला (जगताप)
 7. सरोज (पाटील)
 8. शरद
 9. मीना (जगधने)
 10. प्रताप
 11. नीला (सासणे)

प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं
वसंतराव पवार हे ख्यातनाम वकील होते. कोर्टातील एका प्रकरणात त्यांचा खून झाला. आप्पासाहेब शेती व्यवसायात अग्रेसर होते. त्यानंतरचे माधवराव (बापूसाहेब) हेदेखील व्यावसायिक होते. सूर्यकांत पवार हे नगररचनाकार होते. ते विदेशात स्थायिक झाले. शरद पवारांनी राजकारणात खूप मोठी झेप घेतली. भावांमध्ये सर्वांत धाकटे प्रताप पवार. ते इंजिनीअरिंग आणि वृत्तपत्र व्यवसायात आहेत. सरलाताई (जगताप), सरोजता (पाटील), मीना (जगधने), नीलाताई (सासणे) त्यांच्या त्यांच्या कुटुंबात बिझी आहेत. सरोजताईंचा विवाह, ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्याशी झाला. राजकारणाचा विचार केला तर, शरद पवार यांच्यानंतर पुढच्या पिढीमध्ये अनंतराव पवार यांचे चिरंजीव अजित पवार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे सक्रीय राजकारणात आहेत.

शरद पवार यांचा मास्टर स्ट्रोक राष्ट्रवादीला मिळाला बुस्टर 

राष्ट्रवादीच्या मुख्यालयात अस्वस्थता आणि खदखद!

तिसऱ्या पिढीचं राजकारण
शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या. परंतु, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने कुटंबात कोणतेही मतभेद झाले नाहीत, अस पवार कुटुंबीय सांगतात. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील तर, अजित पवार यांनी राज्यातील राजकारण सांभाळले. पुढे आप्पासाहेबांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहितही राजकारणात आला. सध्या तो पुणे जिल्हा परिषदेत सदस्य आहे. रोहित राजकारणात असताना, अजित पवार यांचा मुलगा पार्थही राजकारणात उतरला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं. त्यातल्या पार्थनं गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून निवडणूक लढवली. पण, पार्थचा पराभव झाला. हा पराभव पवार कुटुंबासाठी मोठा धक्कादायक होता, अस बोललं गेलं.

रोहित पवारच का चर्चेत?
सध्या तरुणांमध्ये रोहित पवार यांच्या नावाची खूप चर्चा आहे. रोहित हे पवार कुटुंबात तिसऱ्या पिढीचे राजकारण करतात. आप्पासाहेब आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्र यांनी कृषी व्यवसायात लक्ष दिले. कृषी क्षेत्रातील कामगिरीबद्दल आप्पासाहेबांना पद्मश्री पुरस्कारही मिळाला होता. पुढे त्यांची धुरा रोहित पवार याने सांभाळली. रोहित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात आले. सध्या रोहित बारामती तालुक्यातील शिर्सुफळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तसेच इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत तसेच, बारामती अॅग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. ग्रामीण राजकारणाचा पाया जिल्हा परिषद असतो. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. जिल्हा परिषदेत काम केल्यामुळे रोहित पवार राजकारणात चर्चेत आले आहे. तसेच सोशल मीडियावरही ते सक्रीय असतात. त्यामुळे त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.

(संदर्भ: वाटचाल - प्रताप पवार, लोक माझे सांगाती - शरद पवार  या पुस्तकातील माहितीवर आधारित)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar family information in marathi