पुण्याला तीन मंत्रिपदं? अजित पवारांचे नाव निश्चित; पालकमंत्री कोण?

टीम ई-सकाळ
Saturday, 28 December 2019

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळावीत, अशी शिफारस पक्षाकडं केल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. ते मंत्री कोण? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

पुणे : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला येत्या सोमवारचा (30 डिसेंबर) मुहूर्त मिळालाय. या मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार, याकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय. त्यातही पुणे जिल्ह्यात कोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, याची उत्सुकता सर्वाधिक आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळावीत, अशी शिफारस पक्षाकडं केल्याचं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. ते मंत्री कोण? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राष्ट्रवादीकडून दोन नावे!
विधानसभा निवडणुकीत भाजपचा वारू पुणे जिल्ह्यात रोखण्याचं मोठं काम, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीनं केलंय. जिल्ह्यातील एकूण 21 जागांपैकी 12 जागा काँग्रेस-राष्ट्रवादीनं जिंकल्या तर, भाजपला केवळ 9 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळं मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. पुणे जिल्ह्यातून अजित पवार यांचे नाव मंत्रिमंडळात निश्चित मानले जात आहे. त्याच बरोबर आंबेगावचे आमदार आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्या गळ्यातही मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा - मंत्रिमंडळ विस्तारातील संभाव्य नेत्यांची यादी फुटली?

संग्राम थोपटेंनाही संधी
अजित पवार आणि दिलीप वळसे-पाटील यांच्या बरोबरच काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संग्राम थोपटे भोर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मतदारसंघ पुर्नरचनेनंतर 2009नंतर त्यांनी भोरमध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवलाय. त्यामुळं त्यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. 2014मध्ये मोदी लाटेतही त्यांनी भोरमध्ये काँग्रेसचा गड राखला होता.

आणखी वाचा - केंद्रीय मंत्री म्हणतात, 'भारतमाता की जय म्हणणारेच देशात राहतील'

पालकमंत्री कोण?
मंत्रिपदांबरोबरच पुण्याचे पालकमंत्री कोण असणार? याकडंही सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना, अजित पवार तर, युती सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होती. आता पालकमंत्रिपदची जबाबदारी पुन्हा अजित पवार यांच्याकडेच येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याशिवाय दुसरे कोणतेही नाव पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune district may get three ministers in uddhav thackeray's cabinet expansion