अल्पभूधारकांनाच आरक्षण द्यावे - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

पुणे - कुपोषण, बलात्कार, शेतकऱ्यांवरील अन्याय यासंबंधी सरकारकडे व्यथा मांडणे म्हणजे राजकारण नव्हे. आरक्षणाचेही तसेच आहे. सुप्रिया सुळे यांच्या मुलांना आरक्षण नको आणि देऊही नये. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांना खरी आरक्षणाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला आरक्षण देण्याच्या मागणीचे समर्थन केले. 

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत सुळे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ""येत्या संसदीय अधिवेशनात आरक्षण, शेतीमालास योग्य भाव, महिलांवरील अत्याचार या विषयांवर चर्चा घडावी. यासाठी मी केंद्राकडे विनंती करणार आहे. त्याचप्रमाणे राज्य सरकारने चांगले काम केल्यास आनंद आहे; पण कोणावर अन्याय होत असेल, तर सरकारसमोर जनतेची बाजू मांडत राहणार. कांदा, टोमॅटो, सीताफळ, ज्वारी, बाजरी, झेंडूची फुले यांसारख्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही म्हणून शेतकरी अडचणीत आहे. ही सद्यःस्थिती असून, सत्ताधाऱ्यांनी त्यांची जबाबदारी ओळखायला हवी.'' 

""राज्यात आघाडी सरकार असताना बाल कल्याण कार्यक्रम चांगल्यारीतीने राबविला होता; पण गेल्या दोन वर्षांत बदललेल्या योजनांचे पडसाद उमटत आहेत,'' असेही त्या म्हणाल्या. 

""माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल त्या म्हणाल्या, ""पवारसाहेब पन्नास वर्षे राजकारणात आहेत. त्यांनी कायमच स्त्री-पुरुष समानतेला (जेन्डर इक्वॅलिटी) प्राधान्य दिले. आमच्या कुटुंबातही प्रत्येकाची स्वतंत्र ओळख आहे. पवारसाहेबांमुळे आम्ही आहोत. संघटना आमच्यापेक्षा मोठी आहे. मात्र, आमच्या कुटुंबावर काही जरी आरोप झाले तरी वेदना होतात; पण आम्ही आमच्या कुटुंबीयांवर विश्‍वास ठेवून कार्य करीत राहतो,'' असे सुळे म्हणाल्या. 

सायरस यांना हटविणे संस्कृतीला धरून नाही 
टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांना हटविण्याबाबत नाराजी व्यक्त करीत सुप्रिया सुळे म्हणाल्या, ""सायरस मिस्त्री यांना हटविण्यापूर्वी त्यांना त्यांची बाजू मांडायला द्यायला हवी होती. त्यांना पदावरून दूर करणे हे संस्कृतीला धरून नाही; तसेच माजी सैनिकाच्या आत्महत्येविषयीचे राजकारण करणेदेखील अयोग्य आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबीयास भेटून कोणीही सांत्वन करू शकते. त्यात गैर काही नाही.''

Web Title: Reservations should be land holders - Sule