मध्यरात्रीचा थरार..अपहरण केलेल्या चिमुकलीला तासाभरात शोधले!

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

घरी आलेला लांबच्या नात्यातील पाहुणा अन्‌ त्याच्या साथीदारानेच रात्री अंगणात झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. पोटच्या गोळ्याचे अपहरण झाल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली. घटनेची गांभीर्य ओळखून आयुक्तालय हददीतील सारे पोलीस कामाला लागले. वारंवार ब्रोकन विंटो रिस्पॉन्स पद्धतीचा पोलीस आयुक्तांकडून होणाऱ्या सूचनेचे पालन केले असता, तासाभरात अपहरण केलेली चिमुकली पोलिसांच्या हाती लागली.

नाशिक : घरी आलेला लांबच्या नात्यातील पाहुणा अन्‌ त्याच्या साथीदारानेच बुधवारी (ता.16) रात्री अंगणात झोपलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण केले. पोटच्या गोळ्याचे अपहरण झाल्याने पालकांनी पोलिसात धाव घेतली. घटनेची गांभीर्य ओळखून आयुक्तालय हददीतील सारे पोलीस कामाला लागले. वारंवार ब्रोकन विंटो रिस्पॉन्स पद्धतीचा पोलीस आयुक्तांकडून होणाऱ्या सूचनेचे पालन केले असता, तासाभरात अपहरण केलेली चिमुकली पोलिसांच्या हाती लागली. दोघा संशयितांना अटक केली आहे. मध्यरात्रीला घडलेल्या या प्रकारानंतर पालक आणि नागरिकांनी पोलिसांचे तोंड भरून कौतूक केले. त्याचे आयुक्त आणि पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही समाधान लाभले. 

आयुक्तांच्या ब्रोकन विंडो रिस्पॉन्सचा परिणाम 
दीपक अंबादास घायतडक (२९, रा. भीमवाडी, सहकारनगर, नाशिक), सुभाष शंकर फसाळे (३२, रा. कालिकानगर, नाशिक) असे दोघा संशयितांची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जुन्या नाशिकमध्ये राहणाऱ्या पीडित चिमुकलीच्या पालकांचा लांबचा नातलग संशयित दीपक घायतडक व सुभाष फसाळे हे दोघे घरी आले. त्यानंतर त्यांनी पीडित पालकांचे लक्ष विचलित करून त्यांच्या पाच वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून पसार झाले. पालकांनी त्यांची मुलगी दिसेना म्हणून शोधाशोध सुरू केली. कुठेही दिसेना.अखेर रात्री साडेबारा-एक वाजेच्या सुमारास त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी केलेल्या तपासातून चिमुकली सुखरूप पोलिसांच्या हाती लागली. 

आणि सुरू झाला थरार 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले आणि तात्काळ वायलेसवरून घटनेची माहिती देत चिमुकल्या मुलीसह कोणी दिसलास ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. सदरची माहिती पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, परिमंडळ एकचे उपायुक्त अमोल तांबे यांनाही मिळाली आणि तात्काळ "ब्रोकन विंटो रिस्पॉन्स'पद्धतीने शोध घेण्याच्या सूचना रात्रीपाळीच्या गस्ती पथकांना देण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांनी बसस्थानक, रेल्वेस्थानकांसह निर्जनस्थळांची बारकाई पाहणी सुरू केली. तोपर्यंत भद्रकाली पोलीसांनी पालकांशी सातत्याने चौकशी केली असता, दोघा संशयितांची नावे समोर आली. त्यामुळे त्यांचा शोध सुरू केला असता, दोघांपैकी एक संशयित हा जुन्या मुंबई-आग्रा महामार्गावरील एचआरडी सेंटर वॉचमन असल्याचे समोर आले. तात्काळ पोलिसांचा ताफा एचआरडी सेंटर येथे पोहोचला असता, दोघांना अटक करण्यात आली. तर संशयितांनी चिमुकलीला एका खोलीत ठेवले होते. अवघ्या तासाभरात चिमुकलीला पालकांच्या हाती सोपविताना पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी बजाविलेल्या कामाचे समाधान होते. 
 
शोध पथकाला रिवॉर्ड 
घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ अपहृत चिमुकलीचा शोध लावण्यात यशस्वी ठरलेल्या पथकाला पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, उपायुक्त अमोल तांबे यांनी 10 हजार रुपयांचा रिवॉर्ड दिला. यात भद्रकालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश हांडे, उपनिरीक्षक व्ही.एस. जोनवाल, आर.टी. मोजाड, यू.जी. पाटील, एस.एस. खालकर, एस. के. गायकवाड, सुधीर चव्हाण, होमगार्ड जाधव यांच्या पथकाने ही जबाबदारी पार पाडली. 
 
काय आहे ब्रोकन विंडो रिस्पॉन्स? 
चिमुकल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार आल्यानंतर तेवढयावर फोकस न करता, यातून संभाव्या परिणामांचा विचार करून तात्काळ त्यादिशेने पोलीस तपासाची चक्र वेगात फिरली पाहिजे. जेणे करून संशयितापासून अपहृत मुलीला कोणतीही इजा पोहोचता कामा नये. अशा घटनांमध्ये संशयितांकडून चिमुकलीवर अत्याचार करून तिच्या जीवाला धोका पोहोचवू शकतो... यालाच ब्रोकन विंटो रिस्पॉन्स असे म्हटले जाते. याबाबत पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी वारंवार सूचना क्राईम मिटिंगमध्ये दिल्या आहेत. आज त्याच दिशेने तपास केल्याने मोठी दुर्घटना टाळता आली आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The abducted girl was discovered within an hour