डिजिटल युगात सुंदर हस्ताक्षर आहे कुठे? वाचा..

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

'सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना' ,'मोत्यासारखे, वळणदार अक्षर' असे सुविचार पूर्वी शाळेत शिकवले जात. मात्र, पाटी, पेन्सिल, पेनचा कमी झालेला वापर आणि शाळांमधून देण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे संगणकाच्या युगात हस्ताक्षर कलाच लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मनमाड : 'सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना' ,'मोत्यासारखे, वळणदार अक्षर' असे सुविचार पूर्वी शाळेत शिकवले जात. मात्र, पाटी, पेन्सिल, पेनचा कमी झालेला वापर आणि शाळांमधून देण्यात येणाऱ्या डिजिटल शिक्षणामुळे सुलेखनाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे संगणकाच्या युगात हस्ताक्षर कलाच लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या पिढीने कॉम्प्युटर व टॅबलेट, मोबाईलला जवळ केल्याने सुलेखनाशी जवळीक कमी झाली आहे.

सुलेखनाशी जवळीक कमी
प्रत्येकाचे हस्ताक्षर सुंदर असावे असा पूर्वी आग्रह धरला जाई मात्र कालांतराने सुंदर हस्ताक्षर विद्रुप होत गेले. वळणदारपणा राहिला नाही. लिहिण्याचा सराव कमी झाला त्यामुळे सुंदर अक्षर असावे असे कोणालाही वाटत नाही विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर असावे असा आग्रह आणि त्याचा सराव शाळेत शिक्षकांकडून धरला जात. मात्र बदलत्या काळाप्रमाणे शाळेतील शिक्षण पद्धतीत सुधारणा झाली आहे. पूर्वी पाटी, पेन्सीलच्या साहाय्याने विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात होते. आज मात्र, त्याचे प्रमाण कमी झाले आहे. आज डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या हातात पाटी, पेन्सील ऐवजी टॅब अन् कॉम्प्युटरचा माऊस, कीबोर्ड आला आहे. यामुळे सुंदर हस्ताक्षराची कला लुप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर ऑनलाईन, मेल, मॅसेज,फोन या सुविधेमुळे पेपर आणि पेन यांची गरज राहिली नाही तुरळक कामे सोडली तर कागद पेनची आज गरज भासत नाही त्यामुळे संगणकावर सततच्या कामामुळे हस्ताक्षर खराब येत असल्याने लिखाणाकडेही दुर्लक्ष होत आहे. पूर्वी शिक्षक किंवा पालक याबाबत कटाक्षाने लक्ष देत अनेकदा खराब अक्षरामुळे ‘हे काय मांजराचे पाय उंदराला?’ असा टोमणा देत मात्र आता लिखित अक्षरांना महत्व राहिले नसल्याने याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही ज्याचे सुंदर हस्ताक्षर त्याचे सर्वजण कौतुक करतात. या उलट ज्याचे हस्ताक्षर खराब त्याची प्रतारणा करतात. मात्र संगणकाच्या युगात हस्ताक्षर कलाच लोप पावण्याची भीती निर्माण झाली आहे 

सुंदर हस्ताक्षरासाठी स्पर्धा लोप पावतेय
वळणदार, सुंदर, मोत्यासारखे हस्ताक्षर येण्यासाठी पूर्वी सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, प्रशिक्षण वर्ग यांचे शाळेतून, एखाद्या संस्थेकडून आयोजन केले जात. शाईपेन, कटनीबचे पेन, आलेख वही, शाईची दौत वगैरे साहित्याचा वापर होई मात्र, बदललेल्या डिजिटल क्लासरूम व कम्प्यूटर वापरामुळे विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर येण्याचे प्रमाण घटले आहे. आजच्या काळात कॉम्प्युटरच्या वापरामुळे मुळची सुलेखनाचे कला ही नाहीशी होवू लागली आहे.

सुंदर हस्ताक्षर हा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचाच एक हिस्सा असतो. 
नीटनेटकेपणा, शिस्त, कलात्मकता, असे कितीतरी गुण एखाद्याचे अक्षर पाहून आपल्या लक्षात येतात. सुंदर हस्ताक्षर ही माणसाची वेगळी ओळख निर्माण करून देते. प्रत्येकालाच आपले अक्षर सुंदर असावे, असे वाटते. आपल्या मुलांचे हस्ताक्षर सुंदर वळणदार असावे यासाठी पालकांनी कटाक्षाने लक्ष देणे गरजच आजच्या काळात निर्माण झाली आहे तर हस्ताक्षर लेखन कला टिकून रहावे यासाठी शाळा, शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the digital age, beautiful handwriting are disappearing