Video : सप्तश्रृंगी गडावर छबिना मिरवणूक; जमला तृतीयपंथीयांचा मेळा..

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

गेल्या २५ वर्षात तृतीयपंथीयांची (किन्नर) सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमा उत्साहात अधिक प्रमाणात बघावयास मिळत असून आई भगवतीची प्रचिती व महिमा सर्वदुर पसरल्याने देशभरातील तृतीय पंथीयांची कोजागिरी पौर्णिमेस सप्तशृंगी गडावर उपस्थिती वाढू लागली आहे. त्याचबरोबर या दिवशी लाखो भाविक आदिमायेच्या दर्शना बरोबरच तृतीय पंथ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दाखल होवू लागले आहे. 

वणी : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ असलेल्या श्रीक्षेत्र सप्तश्रृंगगड (वणी गड) कोजागरी पौर्णिमेला तृतीयपंथींचा मेळावा भरतो. या मेळाव्यासाठी गडावर राज्यभरातील तृतीयपंथी दाखल होतात. यात मुंबई, पुणे, कल्याण, नाशिकसह मध्य प्रदेशातील तृतीयपंथींचाही समावेश होता. पूर्वी सप्तशृंगी गडावर कोजागिरी पौर्णिमेस नगन्य असे तृतीय पंथीय देवीच्या दर्शनासाठी येत.

आईचा जागर करण्यासाठी हजारोच्या संख्येने दाखल

गडावरील शिवालय तलावालगत अर्धनारी नटेश्वरीचे मंदीर आहे. मूर्तीचे अर्धे शरीर हे शिवाचे व अर्धे शरीर हे देवीचे आहे असे समजले जात असल्याने तृतीय पंथीय देवीच्या पुजना बरोबर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आई सप्तशृंगीचा जागर करण्यासाठी हजारोच्या संख्येने दाखल होवू लागले आहे.

तृतीयपंथीयांची सप्तशृंगीगडावर कोजागिरी पौर्णिमा

गेल्या २५ वर्षात तृतीयपंथीयांची  (किन्नर) सप्तशृंगीगडावर कोजागिरी पौर्णिमा उत्साहात अधिक प्रमाणात बघावयास मिळत अ्सून  आई भगवतीची प्रचिती व महिमा सर्वदुर पसरल्याने देशभरातील तृतीय पंथीयांची कोजागिरी पौर्णिमेस सप्तशृंगी गडावर उपस्थिती वाढू लागली आहे. त्याचबरोबर या दिवशी लाखो  भाविक आदिमायेच्या दर्शना बरोबरच तृतीय पंथ्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी दाखल होवू लागले आहे. 

तृतीयपंथीयाचा धार्मिक विधी

कोजागिरी पौर्णिमेचा मुहुर्तावर राज्यभरातील सर्व तृतीय पंथ्यांच्या प्रमुखांनी स्वतंत्रपणे आपल्या शिष्य गणांसह शिवालय तलावावर स्नान करुन सोबत आणलेल्या देवीच्या मुर्तींना शास्त्रोक्तपणे अभीषेक करतात. त्यानंतर गट प्रमुख अर्थात गुरुंना लिंब चढवून (लिंबाचे पाने) शिवालय तलावा लगत अर्धीनारी नटेश्वरी देवीचे पुजाविधी करुन दर्शन घेतात. त्यानंतर प्रत्येक गुरुंना त्यांच्या शिष्यांनी दुध, चंदन, हळद, कुंकु तसेच गुलाब जल या पंचामृताने अभिषेक केला. पुढे सर्वांनी स्वत:चा साज शृंगार करुन गट प्रमुखांची लिंब मिरवणूक अर्थात लिंबाची माळ, कडुलिंबाची माळ व इतर साजशृंगार करीत मंदीराच्या पहिल्या पायरी पर्यंत डफांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते.

यात तृतीयपंथीयासंह सामान्य भाविक सहभागी होवून नृत्य करीत गट प्रमुखांचा आशिर्वाद घेतात. यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आकर्षणाचे केंद्र बिंदु असलेल्या छबिना मिरवणुकीस प्रारंभ होता. प्रत्येक गटातील सदस्यांनी पुन्हा नथ, बाजुबंद, पाटल्या, कमरपट्टा, मोहनमाल, ठुशी, पुतळ्या, ओझरटीक, कोल्हापुरी हार, तोडे, तोळबंद्या, बुगड्या, कर्णफुले, गेंदफुल, जोडवे, मासुळ्या, आंगठुळे, करंगुळ्या, नाकीमोरण आदी अलंकारांनी साज शृंगार करुन स्वतंत्रपणे छबीण्याची अर्थात सप्तशृंगी माता, यल्लमा माता व आपल्या कुलदेवीची मुर्ती तसेच सप्तशृंगी मातेस साज शृंगार, नैवेद्य, साडी-चोळी यांची सवाद्य  मिरवणुक काढली जाते.

या मिरवणुकीत भक्तीरसात न्हाऊन निघालेल्या तृतीय पंथ्यांनी वाद्याचा तालावर त्यांच्या सोबत सामान्य भाविकांनी देखील ठेका धरत नृत्य करतात. या मिरवणुकीचा शेवट पहिल्या पायरीवर होऊन सर्व गट प्रमुखांसह शिष्यांनी मंदीराच्या गाभाऱ्यात जाऊन देवीचे दर्शन घेवून सोबत आणलेली साडी-चोळी, नैवेद्य तसेच साज शृंगार देवीच्या चरणी अर्पण करुन या भुतलावरील सर्व प्राणी मात्रांना सुखी ठेव अशी प्रार्थना करुन सप्तशृंग गडाचा निरोप घेतात. दरम्याण तृतीय पंथ्यांना दान देऊन त्यांचे आशिर्वाद घेतले तर ते लाभदायी किंवा शुभ ठरतात असा सामान्य भाविकांमध्ये समज असल्याने तृतीय पंथ्याचा आशिर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात.

दिक्षा विधी  
छबिना मिरवणूक संपल्यानंतर गुरु शिष्यांचा रात्री मेळावा भरतो. यात त्यांच्या गुरूला शिष्याकडून भेट देण्याची पंरपरा आहे. यात नविन शिष्याला दीक्षा दिली जाते.दिक्षा विधी इच्छुक भाविकांचा चौक भरला जातो, देवीच्या मुर्तीला हळद कुंकु लावले जाते, इच्छुक भाविकाला सुचिर्भुत करुन, हळद लावली जाते व त्याला गुरुच्या उजव्या मांंडीवर बसवुन गुरुमंत्र दिला जातो. किन्नरांसह सामान्य स्त्री पुरुष देखील ही दीक्षा घेऊ शकतात. यानंतर रात्रभर जागर करून देवीच्या गीतांचे गायन केले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: festival of transgender at vani