खडसेंना शनिदेव कधी पावणार..? 

कैलास शिंदे
Friday, 24 January 2020

भारतीय जनता पक्षात सडेतोड व्यक्तिमत्त्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे आज पक्षात एकाकी पडले आहेत. पक्षाची सत्ता असताना पदाच्या स्पर्धेतून त्यांचे पक्षातून खच्चीकरण करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनीही पक्षात पुन्हा चांगले स्थान मिळविण्याचा संघर्ष सुरूच ठेवला आहे.

"माझ्या पाठीमागे शनी लागलाय...' भाजपचे नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे पुणे जिल्ह्यातील "शिक्रापूर' गावात व्यक्त केलेले हे विधान. भारतीय जनता पक्षाची राज्यात सत्ता असताना मंत्रिमंडळातून त्यांना बाहेर पडावे लागले. त्यानंतर पुढे विधानसभेचे त्यांचे तिकीटही कापले गेले. त्यांच्या पक्षांतराचीही चर्चा झाली. मात्र, सध्यातरी त्यांनी पक्षात राहणेच पसंत केले. असे असले, तरी त्यांना अद्यापही पक्षात मानाचे स्थान मिळालेले नाही. पक्षातील दिल्लीश्‍वरांच्या दारी त्यांनी धडक दिली, परंतु ते प्रसन्न झाले नाहीत. त्यांचा "शनी' कायम राहिला. सद्यःस्थितीत ते राज्यातील मंदिरात देवाच्या दारी जाऊन देवदर्शन करीत आहेत. त्यामुळे तरी त्यांच्यावर "वक्री' असलेल्या "शनी'वर तोडगा निघेल काय? हे आगामी काळात दिसून येईल. 

नक्‍की पहा - अबब..समोरील दृश्‍य पाहताच वाहनधारकांच्या अंगावर आले शहारे

भारतीय जनता पक्षात सडेतोड व्यक्तिमत्त्व असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे आज पक्षात एकाकी पडले आहेत. पक्षाची सत्ता असताना पदाच्या स्पर्धेतून त्यांचे पक्षातून खच्चीकरण करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांनीही पक्षात पुन्हा चांगले स्थान मिळविण्याचा संघर्ष सुरूच ठेवला आहे. पक्षातील नेतृत्वाशी चर्चा करीत असताना राज्यातील नेतृत्वावर त्यांनी शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले. शिवाय त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतले. त्यामुळे याच काळात त्यांच्या पक्षांतराच्याही चर्चा झाल्या. परंतु त्यांनी ही पक्षांतराची वाट न चोखाळता पक्षात राहणेच पसंत केले. त्यामुळे आता भाजपतील पदाधिकाऱ्यांसह खुद्द खडसे यांच्याच कार्यकर्त्यांतही आता संभ्रम निर्माण झाला आहे. खडसे नेमके काय करणार, याबाबत अद्यापही गुढच आहे. कार्यकर्त्यांच्या प्रश्‍नाचे उत्तरही त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. 

दुसरीकडे खडसे पक्षातील नेत्यांचीही भेट घेत आहेत. दिल्लीत जाऊन त्यांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली. तर पक्षाचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावात येऊन त्यांची भेट घेतली. मात्र, त्यानंतरही खडसे यांचा पक्षातील सन्मानाच्या स्थानाबाबत मार्ग सुकर झालेला नाही. पक्ष नेतृत्व अद्यापही कुठे तरी खडसे यांची परीक्षा पाहत असल्याचे चित्र आहे. खडसेही नेतृत्वाची कसोटी घेत असल्याचे दिसून येत आहे. पक्षांतर्गत असलेल्या बिकट परिस्थितीत खडसे सध्या राज्यात देव-देव करीत आहेत. राज्यातील देवस्थानात जाऊन ते देवांचे दर्शन करीत आहेत. देवाकडे गाऱ्हाणे मांडत असताना त्या ठिकाणी होत असलेल्या पत्रकार परिषदेत मात्र ते पक्षाच्या नेतृत्वावर हल्ले करीत आहेत. गेल्या 13 जानेवारीला खडसे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले, "पक्ष बदललाय... त्यामुळे राजकारण करण्यापेक्षा आता उद्योगधंदे वाढवा. माझ्या मागे "शनी' लागलाय त्यामुळे आपण शनिदेवाच्या दर्शनाला जाणार आहोत. त्यानंतर 20 जानेवारीला त्यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. 21 जानेवारीला पंढरपूर येथे विठुरायाच्या पायावर माथा टेकविला, तर याच दिवशी अक्‍कलकोट येथे स्वामी समर्थ मंदिरात ध्यान केले. त्या अगोदर खडसे यांनी श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथे शनिदेवाचे दर्शन व शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेतले आहे. 

देवदर्शन, नेत्यांना साकडे 
श्री. खडसे यांनी आपल्या दिल्लीश्‍वर पक्षनेत्यांच्या दारी जाऊन भेट घेतली. राज्यातील पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस त्यांना जळगावच्या भूमीवरच भेटले. विरोधी पक्षातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार, मुख्यमंत्री व शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. नंतर राज्यातील देवांच्या चरणीही त्यांनी साकडे घातले आहे. त्यांची राजकीय आणि देवभक्तीचीही प्रदक्षिणा पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता त्यांनी केलेला देवाचा धावा सत्कारणी लागून त्यांच्या मागचा "शनी' जाणार काय? हे आता त्यांना पक्षात आगामी काळात मिळणाऱ्या स्थानावरूनच ठरणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse tudja bhavani shanidev