थापाड्यांचं सरकार जनता उलथवून टाकणार : अशोक चव्हाण

थापाड्यांचं सरकार जनता उलथवून टाकणार : अशोक चव्हाण

सटाणा : भाजप-शिवसेनेला जनतेच्या प्रश्नांची जाणच नाही. त्यांनी जनतेला केवळ खोटी आश्वासनेच दिली. आता सरकारच्या पापाचा घडा भरलाय. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा काँग्रेसचेच सरकार आणले पाहिजे. त्यासाठीच हा जनसंघर्ष सुरु असून भाजप - शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही. या थापाड्या सरकारबद्दल लोकांमध्ये एवढा उद्रेक आहे की, जनताच आता परिवर्तन करून हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनिशी सज्ज आहे. असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी आज रविवार (ता.7) रोजी येथे दिला.  

भाजप सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्षाने काढलेल्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेचे आज येथे आगमन झाले. येथील मालेगाव रस्त्यावर यात्रेचे स्वागत झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर टिळक रोडवर आयोजित जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते. 

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मविप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, उपसभापती राघो अहिरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, आमदार सुधीर तांबे, निर्मला गावित, शिरीष कोतवाल, एड. विजयबापू पाटील, यशवंत पाटील, महिला जिल्हाध्यक्ष ममता पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा नयना गावित, पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील, नगरसेवक दिनकर सोनवणे, सचिन कोठावदे, यशवंत अहिरे, अण्णा सोनवणे, प्रल्हाद पाटील, उत्तराताई सोनवणे, डी. जी. पाटील, फिरोज शेख, बबलू शेख आदी उपस्थित होते. 

खासदार चव्हाण म्हणाले, भाजप - शिवसेना सरकारने राज्यावर पाच लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर करून ठेवला आहे. राज्य दुष्काळाने होरपळत असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमालीच्या वाढल्या आहेत. या राज्यात शेतकऱ्याला कोणी वाली नसून 2019 च्या निवडणुकांना सामोरे जातांना विश्वासघातकी भाजप सरकारला धडा शिकवून जनतेने काँग्रेस सरकारला सत्तेवर आणावे. काँग्रेस सरकारच्या काळात विकासात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राची भाजप - शिवसेना सरकारने अधोगती केली आहे. शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला भाव नाही. कर्जमाफी मिळाली नाही. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. नुकसानीची मदत मिळत नाही. जनतेला मदत करण्याऐवजी सरकार इंधनावर कर लादून सर्वसामान्यांची लूट करत आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. हजारो लोकांचा रोजगार गेला आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सर्वच घटक अडचणीत आले आहेत. सामान्य माणसाच्या गरजा, संवेदना ज्या सरकारला समजत नाही. त्यांना सत्तेवरून उतरविण्याची वेळ येवुन ठेपली असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकरी आत्महत्यांवर विरोधी बाकावर असलेले देवेंद्र फडणवीस काँग्रेसच्या मंत्र्यांवर 302 चा खटला दाखल करण्याची मागणी करत होते. आता तेच फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री असताना गेल्या चार वर्षात 15 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आता 302 चा खटला कोणावर दाखल करायचा? मोदी हे हुकूमशहा असून या भाजप सरकारला आता घरी बसवल्याशिवाय जनतेला 'अच्छे दिन' येणार नाहीत. राफेल विमान खरेदी घोटाळा हा देशातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा असून त्याची किंमत तिप्पट कशी झाली, याचा जाब विचारणाऱ्या राहुल गांधींना मोदी सरकारकडून उत्तर मिळत नाही. राज्याच्या कृषी अर्थव्यवस्थेचा विकासदर 8.3 टक्यांनी घसरला आहे. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून रुपया 16 टक्यांनी घसरला. यालाच अच्छे दिन म्हणतात का? जी चूक 2014 च्या निवडणुकांमध्ये केली ती चूक आता 2019 च्या निवडणुकांमध्ये करू नका असे आवाहनही त्यांनी चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

यावेळी डॉ.तुषार शेवाळे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साखरचंद कांकरिया, शहराध्यक्ष किशोर कदम, आमदार असिफ शेख आदींची भाषणे झालीत. सभेस भिका सोनवणे, रिजवान सैय्यद, सिराज मुल्ला, रवींद्र पवार, सचिन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, भगवान सोनवणे, प्रसाद दळवी आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री व धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा 'राफेल' विषयी कोणताही अभ्यास नाही. त्यामुळे वाटेल तशी निरर्थक उत्तरे देऊन ते जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या भाषणात केला. तर डॉ. सुभाष भामरे यांना आता 'राफेल' विषयी काही कामच उरलेलं नाही, सध्या त्यांना फक्त तालुक्यातील पोलिस अधिकारी, तहसिलदार या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे इतकंच काम उरलेलं आहे. असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावताच सभेतील उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com