Vidhan Sabha 2019 : संजय राऊत यांनी घेतली राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवाराची भेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

ऐन निवडणूक काळात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज (ता.११) पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. मित्रत्वाच्या नात्याने सानप यांची भेट घेण्यासाठी आल्याचा खुलासा राऊत यांनी केला असला तरी यातून भाजपला "दम' तर शिवसैनिकांना वेगळा "संदेश' देण्याची चाल नाही ना? असा सवाल केला जात आहे. 

नाशिक : देशात व राज्यात भाजप शिवसेनेची युती असतानाही विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी बंडखोरीचे निशाण फडकल्यानंतर युतीचा धर्म पाळण्याचा सल्ला देणाऱ्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मात्र आज सकाळी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या पंचवटीतील निवासस्थानी भेट दिल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मित्रत्वाच्या नात्याने सानप यांची भेट घेण्यासाठी आल्याचा खुलासा राऊत यांनी केला असला तरी यातून भाजपला "दम' तर शिवसैनिकांना वेगळा "संदेश' देण्याची चाल नाही ना? असा सवाल केला जात आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढतं असताना नाशिकच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडताना दिसतं आहे. पश्‍चिम मध्ये महायुतीच्या वतीने भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर शिवसेनेने बंडखोरी करतं भाजपलाचं आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे बंडात सातपूर, सिडको भागातील शिवसेनेचे 22 नगरसेवक देखील सहभागी झाले असून शिंदे यांच्या प्रचारात सकाळपासून संध्याकाळ पर्यंत सर्वचं सहभागी होत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राऊत यांची भेट घेत बंड शमविण्याचे साकडे घालतं युतीचा धर्म पाळण्याची आठवण करून दिली. त्यानंतर राऊत यांनी बंडखोर नगरसेवकांची गुरुवारी रात्री भेट घेत त्यांची भुमिका समजावून घेत, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे भुमिका मांडण्याचे आश्‍वासन दिले.

नाशिकचे राजकीय वातावरण ढवळले

वास्तविक राऊत यांनी बंडखोरांना समज देवून बंड शमविता आले असते. परंतू उध्दव ठाकरे यांच्या कोर्टात चेंडू टोलावून त्यांनी वेळ मारून नेल्याने महायुतीची फाईट नेमकी विरोधकांमध्ये आहे कि भाजप व शिवसेनेत हा गुंतागुंतीचा प्रश्‍न सुटत नाही तोच शुक्रवारी सकाळी पूर्व मधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार बाळासाहेब सानप यांच्या भेटीला खासदार राऊत पोहोचल्याने नाशिकचे राजकीय वातावरण ढवळून निघाले. राऊत यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस उमेदवाराच्या भेटीने राज्याच्या राजकारणात वेगळाचं संदेश पोहोचल्याने निवडणुकीनंतर राजकीय समिकरणे बदलण्याची देखील शक्‍यता या निमित्ताने निर्माण झाली आहे. माजी आमदार जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी खासदार राऊत यांचे स्वागतं केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Raut visits NCP's candidate