मतदार चिट्ठी वाटप कार्यक्रमामुळे शिक्षकांची दमछाक 

Teachers Election.jpg
Teachers Election.jpg

नाशिक : जिल्हयात विधानसभा पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून निवडणूक यंत्रणा प्रशासकीय कामांसह मतदानाचा टक्का वाढविण्याच्या कामात व्यस्त आहे. प्रत्यक्ष मतदानास केवळ चार दिवसांचा कालावधी शिल्लक  राहिल्याने बीएलओच्या माध्यमातून मतदार चिठ्ठी वाटपाचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. चार दिवसात जिल्हयात ४५ लाख मतदार चिठ्ठया वाटपाचे काम करावे लागणार आहे. सध्या विद्यार्थ्यांची सहामाही परीक्षा सुरु असल्याने चिठ्ठी वाटप कार्यक्रमात शिक्षकांची मोठी दमछाक होणार आहे. जिल्हयातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघात मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात झाली आहे.  
   
बीएलओच्या खांद्यावर चिठ्ठी वाटपची धुरा; शिक्षकांच्या अडचणीत वाढ
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार चिठ्ठय़ांचे वाटप विहित मुदतीत करण्याची सूचना केली होती. यानंतर निवडणूक यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्ह्य़ातील १५ मतदारसंघांत ४५ लाख २४ हजार ६६३ मतदार आहेत. नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ९८ हजार ९२६, तर सर्वात कमी दोन लाख ५९ हजार मतदार इगतपुरीमध्ये आहेत. सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदारसंघात सरासरी पावणेतीन लाख मतदार असल्याचे दिसून येते. या सर्व मतदारसंघांत २१ ऑक्टोबरला मतदान होत आहे. तत्पूर्वी, मतदारांपर्यंत मतदार चिठ्ठींचे वाटप होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागात काम करणाऱ्या बीएलओच्या खांद्यावर चिठ्ठी वाटपची धुरा सोपविण्यात आली आहे. विशेष म्हणजे चिठ्ठी वाटपाची संबंधित मतदाराकडून सही घ्यावी लागणार असल्याने शिक्षकांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बीएलओकडून मतदान चिठ्ठींचे वाटप योग्य पद्धतीने व्हावे यासाठी त्यांच्या पर्यवेक्षकांनाही तपासणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यात आढळून येणाऱ्या मयत मतदारांच्या याद्या तातडीने निवडणूक कार्यालयात जमा करण्यास सांगण्यात आले आहे. चिठ्ठय़ांचे वाटप तातडीने होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी आणि सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या कार्यालयीन कामकाजात सवलत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधितांना दिले. 

मतदार चिठ्ठी ओळखीचा पुरावा नाही 

निवडणूक यंत्रणा मतदार चिठ्ठय़ांचे वाटप करीत असली तरी ही चिठ्ठी मतदाराच्या ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नसल्याचे बागलाणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भांगरे यांनी सांगितले. ज्या मतदार चिठ्ठय़ा वाटप होणार नाहीत त्या पुन्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात जमा करायच्या आहेत. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर त्यांचे वाटप होणार नाही. त्या ठिकाणी मतदानाच्या दिवशी बीएलओ केवळ वर्णानुक्रमाच्या याद्या घेऊन मतदारांना साहाय्य करण्यासाठी उपस्थित असतील. 

मतदान प्रक्रिया सोडून शिक्षकांना कोणतेही अशैक्षणिक कामे नको
बीएलओच्या कामास प्राथमिक शिक्षक संघटनानी कडाडून विरोध केल्यानंतरही न्यायालयाच्या आदेशाची तंबी देऊन ते काम शिक्षकांच्या माथी मारण्यात आले. ऐन परिक्षेच्या काळात शिक्षकांना उन्हात मळेखळे फिरावे लागत आहे. मतदार चिठ्ठी ओळखीचा पुरावा नसल्याने दारोदारी वाटपाचा अट्टहास कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.  यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मतदान प्रक्रिया सोडून शिक्षकांना अन्य कोणतेही अशैक्षणिक कामे नकोत. - पंकज भामरे, तालुकाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती 

मतदारसंघ निहाय मतदारसंख्या अशी 
नांदगाव (३ लाख १७ हजार २८३),मालेगाव मध्य (२ लाख ८४ हजार ९९९), मालेगाव बाह्य (३ लाख ३६ हजार ८३३), बागलाण (२ लाख ७५ हजार ७५७),कळवण (२ लाख ६८ हजार ६२३), चांदवड (२ लाख ८० हजार १०८), येवला (२ लाख ९६ हजार २४६), सिन्नर (३ लाख ३६८), निफाड (२ लाख ६८ हजार ४१०),  दिंडोरी (३ लाख २ हजार ४५४), नाशिक पूर्व (३ लाख ५२ हजार ८६२), नशिक मध्य (३ लाख १५ हजार ९६३), नाशिक पश्चिम (३ लाख ९० हजार ५५१), देवळाली (२ लाख ६४ हजार २९७), इगतपुरी (२ लाख ६० हजार ८००)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com