मॉस्कोमध्ये आज अण्णा भाऊ साठेंच्या दोन पुतळ्यांचे अनावरण

संतोष विंचू ः सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी साकारले आहेत. 

येवला (नाशिक) ः साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या स्मृतींचा गंध रशियात दरवळणार आहे. सह्याद्रीच्या कुशीतील अण्णा भाऊ साठे यांच्या दोन पुतळ्यांचे सोमवारी (ता. 16) मॉस्को शहरातील रिटामार्गाटीटो ग्रंथालय आणि पुस्किन विद्यापीठात अनावरण होईल. हे पुतळे गोदाकाठच्या नाशिकमधील शिल्पकार सुधाकर लोंढे यांनी साकारले आहेत. 
अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रशियात दोनदिवसीय पहिली जागतिक मातंग परिषद होत आहे. मराठीच्या साहित्य परंपरेला अनेक रचनाकार लाभले. त्यांचा यथायोग्य सन्मानही झाला. रशियन जनतेने स्वीकारलेल्या अण्णा भाऊ साठे यांचा सन्मान त्यांच्या साहित्याचाही असेल. लावण्या, शाहिरी, पोवाडा यामधील अण्णा भाऊ यांचे योगदान यानिमित्ताने सातासमुद्रापलीकडे वृद्धिंगत होत आहे. मॉस्कोमधील पुस्किन विद्यापीठात सोमवारपासून दोन दिवस जागतिक परिषद रशियात घेण्यामागील कारणांतील महत्त्वाचे कारण म्हणजे तेथील सरकारने 1961 मध्ये इंडो-रशियन सरकारने खास निमंत्रण देऊन अण्णा भाऊ साठे यांना सन्मानित केले होते. पुस्किन विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि महाराष्ट्र एम. जी. डी. ग्रुपतर्फे ही परिषद होत आहे. परिषदेत भारत व इतर 23 राष्ट्रांतील मातंग समाजबांधव सहभागी होणार आहेत. पुतळा अनावरनासह साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. 

भारतातील 350 प्रतिनिधींचा सहभाग 
अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे व आमदार सुधाकर भालेराव यांनी दोन्ही पुतळ्यांच्या निर्मितीचा भार उचलला. परिषदेचे दोन वर्षांपासून नियोजन करण्यात आले. परिषदेत वरिष्ठ पोलिस अधिकारी एस. कृष्णप्रकाश, जिल्हाधिकारी दिवेकर, दिलीप कांबळे, मुंबई विद्यापीठाचे डॉ. बळिराम गायकवाड यांच्यासह भारतातील समाजबांधव असा साडेतीनशे प्रतिनिधींचा सहभाग असेल. सुनील वारे, संजय देशपांडे यांचे सहकार्य परिषदेसाठी लाभले आहे. डॉ. सुधाकर कोटंबे यांचे विद्यावाचस्पतीस्तरावरील "मातंग समाजाच्या समस्या' या शोधनिबंधावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन होईल. प्रकाशन वैद्यकरत्न डॉ. सुरेश कांबळे हे करतील. 
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊ साठे यांचे प्रभुत्व होते. त्यांच्या साहित्याचे रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील 27 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. रशियन जनतेने त्यांचे साहित्य त्यावेळीच स्वीकारले व आजही लोकप्रिय आहे. दरम्यान, परिषद व पुतळा अनावरण सोहळ्यासाठी नाशिकमधून पंधराहून अधिक समाजबांधव मॉस्कोला पोचले आहेत. अण्णा भाऊ साठे यांचे एकही छायाचित्र अथवा प्रतिमा समोर न ठेवता श्री. लोंढे यांनी पुतळे साकारले आहेत. त्यासाठी सहा लाखांचा खर्च आला आहे. 

रशियात पुतळा अनावरण म्हणजे अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सातासमुद्रापार होत असलेला सन्मान आहे. मराठी माणसासाठी हा अद्‌भुत असा क्षण असल्याने त्याचे साक्षीदार होण्यासाठी नाशिकमधून आम्ही पंधरा जण मॉस्कोत पोचलो आहोत. अण्णा भाऊ साठे रशियातील सेवियत स्काय हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्या परिसरात दोन पुतळ्यांचेही अनावरण करण्यात येणार आहे. 
- डॉ. सुरेश कांबळे, येवला 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal News International