दारूबंदी जिल्ह्याची नव्हे, देशाची लढाई : योगेंद्र यादव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

यवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.

यवतमाळ : दारूमुळे घरच नाही; तर देश तुटत चालला आहे. खुर्चीत बसलेल्या नेत्यांना त्याचे सोयरसुतक नाही. दारूबंदी जिल्ह्याची नव्हे तर, देशाची लढाई आहे, असे मत राजकीय विश्‍लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.
स्वामिनी दारूबंदी आंदोलनतर्फे शुक्रवारी (ता. 18) महामोर्चा काढण्यात आला. यावेळी समता मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, चंद्रपूरच्या दारूबंदी प्रणेत्या ऍड. पारोमिता गोस्वामी, लोक जनसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, संयोजक महेश पवार, डॉ. टी. सी. राठोड, माया चावरे आदी उपस्थित होते. यादव म्हणाले, दारूसाठी कित्येक महिलांना पेटविले जाते. यवतमाळ जिल्ह्यात दारूमुळे 30 लोकांचे मृत्यू झाले. सरकारने "आयुष्यमान भारत' ही योजना आणली आहे. मात्र, दारूमुळे आजारनिर्मिती करून जीव घेण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. दारूबंदी करायची असेल, तर "वोटबंदी' करावी लागेल. दारूबंदीचा हा वणवा देशभरात भडकणार असल्याचे त्यांनी सांगितले. महामोर्चामुळे आमदार, खासदार, मंत्र्यांची पदे डामाडोल झाली आहेत. दारूबंदी करायची असेल तर पालकमंत्री मदन येरावार यांच्या घरावर धडक द्यावी, असे आवाहन ऍड. पारोमिता गोस्वामी यांनी केले. विदर्भात दारूनिर्मिती होत नाही. डंपिंग ग्राउंड म्हणून या भूमीचा वापर केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. महिला बोलतात तेव्हा मंत्रालयातील खुर्ची हलायला लागते. महिला अबला नाही, सबला आहे. हे दाखविण्याची लढाई आहे, असे मत प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केले. यावेळी हरीश इथापे, डॉ. राठोड, महेश पवार यांनीही दारूबंदीची मागणी रेटून धरली. समता मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या महामोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

Web Title: darubandi morcha