'खोटी आश्‍वासने देऊन अन्नदात्याचा अपमान'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 डिसेंबर 2017

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अन्नदात्याचा अपमान केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. भाजप केवळ आश्‍वासन देत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या अन्नदात्याचा अपमान केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. भाजप केवळ आश्‍वासन देत असल्याने शेतकरी आत्महत्या वाढल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी या विरोधी पक्षांतर्फे आयोजित जनआक्रोश हल्लाबोल मोर्चानंतर मॉरिस कालेज टी-पॉइंटवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह राष्ट्रवादी, काँग्रेस, सप, शेकाप, रिपाइंचे पदाधिकारी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ‘‘जनतेची, शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने जनआक्रोश स्वाभाविक आहे. नोटाबंदी, ‘जीएसटी’ लागू केल्यानंतर लगेच जपान, अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊन पंतप्रधानांनी तेथील राष्ट्राध्यक्षांच्या भेटी घेतल्या. नोटाबंदीमुळे चिमुकल्यांसह दीडशे जणांचा बळी गेला. कोट्यवधी तरुण बेरोजगार झाले, तीन लाख कोटींचे नुकसान झाले, याला जबाबदार कोण?’’ पंतप्रधान केवळ निवडणुकीत दिसतात किंवा विदेशात दिसतात, त्यांना कुठे भेटायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आज ते गुजरात निवडणुकीत असून आपल्याच देशाचे माजी पंतप्रधान, माजी उपराष्ट्रपती, माजी उच्चायुक्त पाकिस्तानसोबत असल्याचा आरोप करीत ते स्वतःच्या दर्जाहीन मानसिकतेचा परिचय देत असल्याचा टोला पंतप्रधान मोदी यांना हाणला. 

यापूर्वी बिहार निवडणुकीतही नितीशकुमार जिंकल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील, असा प्रचार त्यांनी केला होता. आज नितीशकुमार त्यांच्यासोबत आहेत. जात, धर्माच्या आधारावर फूट फाडण्याचे काम करणाऱ्या भाजपपासून नागरिकांनी सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. भाजपविरोधातील हा जनाक्रोश आता संसदेतूनही मांडणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

‘काश्‍मीरपेक्षा विदर्भाशी  माझे नाते अधिक दृढ’
‘‘माझा जन्म काश्‍मीरचा असला तरी विदर्भाच्या मातीशी माझे नाते अधिक घट्ट आहे,’’ अशा शब्दांत राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी आपल्या भावना व्यक्त केल्या.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल जनआक्रोश मोर्चात गुलाम नबी आझाद आज नागपुरात बोलत होते. गुलाम नबी आझाद यांनी वाशीम मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे; तसेच यवतमाळ मतदारसंघातून त्यांनी दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविली आहे. हा संदर्भ देत आझाद म्हणाले, ‘‘मी जम्मू व काश्‍मीरचा असलो तरी विदर्भाशी माझे संबंध अधिक घट्ट राहिलेले आहे. याच विदर्भाने १९८४ मध्ये वाशीम लोकसभा मतदारसंघातून मला निवडून दिले होते. त्यानंतर या मतदारसंघाचे जवळपास आठ वर्षे प्रतिनिधित्व केले.’’

यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, अशी आठवणही त्यांनी या वेळी सांगितली. राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांवर आझाद यांनी कडाडून हल्ला चढविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, ‘‘भारतासारख्या देशाच्या पंतप्रधानांनी जनतेसमोर खोटे बोलू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक धादांत खोटे आरोप केले आहेत. ते देशाचे पंतप्रधान आहेत, याचे भान त्यांनी ठेवले पाहिजे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news winter session Ghulam Nabi Azad farmer congress