व्यवस्थेच्या नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

सागर वाघ याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रधानमंत्री अवास योजनेसाठी सर्व निकर्ष पूर्ण करूनही मला त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मुद्रा योजनेतून कर्जाची मागणी केली असता तेही बँकेने दिले नाही. सातत्याने दोन वर्षापासून संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाव्यवस्थापक मला फिरवून देत होते. म्हणून माझी ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या आहे. यात सुधार होणे गरजेचे असल्याचेही चिठ्ठीत लिहिले आहे.​

संग्रामपूर : तालुक्यातील पळशी झाशी येथील वाणिज्य शाखेतील पदवीत्तर शिक्षण घेत असलेल्या शेतमजूराच्या मुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज (ता.22) दुपारी घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी एकत्र येऊन मृतदेह झाडावरून खाली उतरवीत थेट संग्रामपूर तहसील कार्यालयात दाखल केला असून, तेथे तणाव सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 

पळशी झाशी येथील शेतमजूर दिनकर वाघ यांच्या चार मुलांपैकी मोठा मुलगा सागर दिनकर वाघ हा वाणिज्य शाखेत पदवीत्तर शिक्षण घेत होते. घरातील गरिबी आणि भूमिहीन शेतमजूरी करत असलेल्या कुटुंबांतील अत्यंत बेताची परिस्थिती पाहता त्याने स्वत: पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरू केली होती. परंतु, त्यात नैराश्य आल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या जवळ आढळून आलेल्या चिठ्ठीमधून समोर आले आहे. सागर वाघ याने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रधानमंत्री अवास योजनेसाठी सर्व निकर्ष पूर्ण करूनही मला त्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच, स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मुद्रा योजनेतून कर्जाची मागणी केली असता तेही बँकेने दिले नाही. सातत्याने दोन वर्षापासून संग्रामपूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखाव्यवस्थापक मला फिरवून देत होते. म्हणून माझी ही आत्महत्या नसून व्यवस्थेने केलेली हत्या आहे. यात सुधार होणे गरजेचे असल्याचेही चिठ्ठीत लिहिले आहे.

पुढे लिहीले आहे की, जोपर्यंत माझ्या परिवाराला कमीत कमी पाच लाख रुपये प्रत्यक्ष सरकारी मदत मिळत नाही तोपर्यंत गावकरी बांधवांनी माझा मृतदेह जागेवरून उचलू देऊ नये. आई आणि बाबा मला माहित आहे माझ्यापुढे तुमच्यासाठी पैशाची काहीच किंमत नाही पण, हे पैसे माझ्या दोन्ही भावाचे भविष्य अंधारातून बाहेर काढण्यासाठी मागणी करत असल्याचेही म्हटले आहे.

गरजूंना अवयव दान करा

सागर वाघ याने चिठ्ठीत शरीराचे जेवढे अवयव गरजू व्यक्तींच्या कामास पडतील ते सर्व दान करावे अशी मागणी गावकरी तसेच नातेवाइकांकडे केली.

शेतमजूरांनी एकत्र यावे

दिवसेंदिवस शेतमजूरांची परिस्थिती ही अत्यंत हालाकीची होत आहे. यासाठी सर्व भेद बाजूला सारून एकत्र येण्याची गरज आहे. सरकारच्या योजना प्रत्यक्ष लाभार्थी प्रयत्न पोचतच नाही. बँक तारण असल्याशिवाय कर्ज देत नाही. घर चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तर तारण कोठून देणार अशा समस्या निर्माण होत असून, यामुळे शेतमजूरांची अवस्था बिकट होत आहे. यासाठी शेतमजूरांनी आता एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे. परंतु, यामध्ये शासकीय तसेच खासगी मालमत्तेचे नुकसान करता कामा नये असेही चिठ्ठीत लिहिलेले आढळून आले आहे. 

मृतदेह थेट तहसील कार्यालयात

सागर वाघ याने नैराश्यातून केलेल्या आत्महत्येनंतर गावकर्‍यांसह नातेवाइकांनी शासकीय यंत्रणेला मृत्यूला कारणीभूत असल्याचे सांगत त्याचा मृतदेह संग्रामपूर तहसील कार्यालयात दाखल केला आहे. तहसील कार्यालयात मोठ्याप्रमाणात जनसमुदाय एकत्र झाला असून, तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र शाखा केली बंद

तहसील कार्यालयात ग्रामस्थांनी मृतदेह दाखल करताच येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बंद करण्यात आली असून, बँक व्यवस्थापकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासाठी ग्रामस्थ व नातेवाईक तामगाव पोलिस स्टेशनला गेल्याचे कळते.

Web Title: Youth suicide due to depression in the system