wari 2019 : भजनाची लयबद्धता जगण्यातही आली 

सचिन शिंदे 
बुधवार, 3 जुलै 2019

नांदेडच्या दिंडीत पांडुरंग महाराज देगलूरकर या  युवकाच्या भजनांनी साऱ्याचे लक्ष वेधले जात होते. वारीत येऊन प्रत्यक्ष माउलीला भेटल्याचा आंनद होतो, अशी बोलकी प्रतिक्रिया अवघ्या विशीतील पांडुरंगने व्यक्त केली. 

बारामती-  बुऱ्हाणपुराच्या पठारावरील मोकळ्या काळ्याशार रानात अनेक राहुट्या पडल्या होत्या. त्यात काही राहुट्यांनी भजनांची लय पकडली होती. नांदेडच्या दिंडीत पांडुरंग महाराज देगलूरकर या  युवकाच्या भजनांनी साऱ्याचे लक्ष वेधले जात होते. वारीत येऊन प्रत्यक्ष माउलीला भेटल्याचा आंनद होतो, अशी बोलकी प्रतिक्रिया अवघ्या विशीतील पांडुरंगने व्यक्त केली. 

"महाराज' या नावाने वारीत त्याला ओळखले जाते. भजनाची लयबद्धता पालखी सोहळ्यात शिकलो. तीच लयबद्धता जगण्यात आणण्याची शिकवणही वारीत घेतली, असेही पांडुरंग सांगतो. 

उंडवडीच्या पठारावर मुक्काम आटोपून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा आज पहाटेची पूजा आटोपून बारामतीकडे मार्गस्थ झाला. वाटेत बुऱ्हाणपुरात पहिला मुक्काम झाला. तेथे सकाळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. आजूबाजूच्या पठारावर जागा मिळेल तेथे दिंड्या थांबल्या होत्या. नांदेडच्या दिंडीत पांडुरंग महाराज देगलूरकर या युवकावर नजर खिळली होती. मृदंगाच्या साथीने तो गात असलेल्या भजनाने लय धरली होती. येणारे- जाणारे ते भजन ऐकण्यासाठी थांबत होते. पांडुरंगाची ही दुसरी वारी आहे. दिंडीतील वारकरी त्याला "महाराज' म्हणून संबोधत होते. पालखी सोहळ्यात वारीत येऊन प्रत्यक्ष माउलीला भेटल्याचा आंनद होतो, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली. 

तो म्हणाला, ""पालखी सोहळ्यात मी पाऊस अनुभवला. चिंब भिजलो, त्यामुळे पालखी सोहळा आनंदाचा ठरला. सोहळ्यातील शिस्त मनाला भिडली आहे. वारीत अनेक गोष्टी  शिकण्यास मिळतात. पाऊस आला अन्‌ हरीचा वीणा झाला ओला, मुखाने तुम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणा... असे म्हणत पांडुरंग महाराज पुन्हा भजनात गर्क झाला. 

उंडवडीच्या पठारावरून पालखी सोहळा सकाळी मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरण, कधीतरी पाऊस अन्‌ हवेतील गारठा अंगावर घेत वारकरी बारामतीकडे कूच करत होते. सायंकाळी पालखी सोहळा कविवर्य मोरोपंत यांच्या बारामतीनगरीत पोचला. सोहळ्याचे शाही स्वागत करण्यात आले.

पालखी सोहळ्यात नव्या पिढीने सहभागी व्हायला हवे. त्यातून अनेक गोष्टी शिकता येतात. त्यात शिस्त, संयमासह भक्ती मार्गही अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येतो. त्यासाठी वारीचा एखादा तरी अनुभव घ्यावा. 
पांडुरंग देगलूरकर, युवा वारकरी, नांदेड 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sant tukaram maharaj palkhi