#VoteTrendLive महापालिकांत भाजपची जबरदस्त मुसंडी

टीम ई सकाळ
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

1. मुंबई : शिवसेनेने करुन दाखविलं!
2. पुणे : 'कमळ' फुलले; 'घड्याळ' बंद
3. नाशिक : 'इंजिन' फेल
4. पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी-भाजपमध्ये टक्कर
5. नागपूर : भाजपची सरशी
6. ठाणे : शिवसेना आघाडीवर
7. सोलापूर : भाजप आघाडीवर
8. अकोला : भाजपची मुसंडी
9. उल्हासनगर : भाजप-शिवसेनेत चुरस
10. अमरावती : भाजपची आघाडी

राज्यभरातील दहा महापालिकांचे निकाल हाती येत असून दुपारी 1 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत शिवसेनेने आघाडी घेतली आहे, तर पुण्यात भाजपने बाजी मारली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिककरांनी झिडकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपरी-चिंचवडचा बालेकिल्ला राष्ट्रवादी आणि नागपूरचा गड भाजप राखेल, अशी चिन्हे आहेत. आतापर्यंतचा कौल पाहता दहा पैकी सात महापालिकांमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

मुंबई : शिवसेनेने करुन दाखविलं!
मुंबई - करुन दाखवलं या टॅग लाईननंतर 'Did You Konw' असे म्हणणाऱ्या शिवसेनेने शतकाजवळ मजल मारत खऱ्या अर्थाने करुन दाखविले. शिवसेनेनंतर भाजप दुसऱ्या स्थानी असून, शिवसेनेने एकहाती सत्तेकडे वाटचाल केली आहे.

शिवसेनेने सुरवातीच्या काही तासांतच 90 हून अधिक जागांवर आघाडी घेत महापालिकेवर वर्चस्व राखले. मुंबई महापालिका निवडणुकीत 227 जागांसाठी 2275 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. उमेदवारी अर्ज भरताना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रातील महत्त्वाच्या माहितीचा गोषवारा त्या-त्या प्रभागातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आला होता. उमेदवाराची शैक्षणिक पात्रता, स्थावर आणि जंगम मालमत्ता, त्याच्यावरील गुन्हे आणि त्याला झालेली शिक्षा असा सर्व तपशील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आले होते. त्यामुळे यंदाची निवडणूक महत्त्वपूर्ण होती.

पुणे : 'कमळ' फुलले; 'घड्याळ' बंद
पुणे : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची पुरती पिछेहाट होत आहे. पालकमंत्री गिरीष बापट आणि खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत जबरदस्त कामगिरी केल्याचे समोर येत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार 48 जागांवर भाजप आघाडीवर आहे. राष्ट्रवादीने 23 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसला दहा आणि शिवसेनेला 8 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

नाशिक : 'इंजिन' फेल
ज्या महानगरपालिकेत वर्चस्व गाजवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिष्ठा कायम ठेवली होती, तेथे पक्षाला जबदरस्त धक्का बसला असून कमळाला फुलविण्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश मिळाले आले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानानुसार भारतीय जनता पक्षाला 21, शिवसेनेला 12, काँग्रेसआणि राष्ट्रवादीला 2, तर मनसेला केवळ एका जागेवर यश मिळाले आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी पॅनलला प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 1, 4, 20 मध्ये भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रभाग क्रमांक आठमधील चारही उमेदवार निवडून आणण्यात शिवसेनेला यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 13 मधील दोन जागांवर कॉंग्रेसला यश मिळाले आहे. तर याच प्रभागातील एका जागेवर मनसेला विजय मिळाला आहे. 

पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी-भाजपमध्ये टक्कर
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेत दुपारपर्यंतच्या मतमोजणी निकालात राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीला भाजपने काटाजोड टक्कर दिली आहे. 19 जागांसह भाजप दुसऱया क्रमांकावर आहे. मतमोजणी पुढे सरकेल, तस तशी दोन्ही पक्षांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेसने पिंपरी चिंचवडमध्ये दुपारपर्यंत खातेही उघडले नव्हते. 

नागपूर : भाजपची सरशी
नागपूर महापालिकेत भाजपने तब्बल 44 जागांवर आघाडी घेत एकतर्फी सत्तेकडे कूच केले आहे. काँग्रेसला केवळ दहा जागांवर आघाडी मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'होमग्राऊंड'वर भाजपने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. 

ठाणे : शिवसेना आघाडीवर
ठाणे महापालिकेत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेना आघाडीवर असल्याच्या बातमीनंतर ठाणेकर शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे. शिवसेनेने 13 जागांवर विजय मिळविला आहे, तर भाजपला सहा जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 28 जागांवर आघाडीवर आहे. 

सोलापूर : भाजप आघाडीवर
सोलापूर महापालिकेत भाजपने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीला शहरात धक्का बसला आहे. माजी महापौर मनोहर सपाटे पराभूत झाले आहे. काँग्रेसलाही भाजपचा फटका बसत असून सभागृह नेता संजय हेमगड्डी पराभूत झाले आहेत. अकोला महापालिकेत काँग्रेसला मागे टाकत भाजपने आघाडी घेतली आहे. 

अकोला : भाजपची मुसंडी
अकोला महापालिकेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जोरदार झटका देत भाजपने 22 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी 7 आणि काँग्रेस सहा जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमचा उमेदवार अकोल्यातील एका जागेवर आघाडीवर आहे. 

उल्हासनगर : भाजप-शिवसेनेत चुरस
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेत चुरशीची लढत सुरु असल्याचे दृश्य आहे. दुपारी साडेबारापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार शिवसेनेने 20 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. शिवसेना आणि भाजपा प्रत्येकी 12 जागांवर विजय प्राप्त झाला आहे. राष्ट्रवादीला चार जागांवर शिक्कामोर्तब करण्यात यश आले आहे.

अमरावती : भाजपची आघाडी
अमरावती महापालिकेत आठ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. भाजप एकूण 17 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसच्या महापौर पराभूत झाल्या आहेत. काँग्रेस केवळ चार जागांवर आतापर्यंत आघाडीवर आहे. 

Web Title:  #VoteTrendLive BJP surged in municipal corporation elections in Maharashtra