
एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने ‘महाविकास’ला धडा! महापालिका, झेडपीसाठी तिन्ही पक्ष स्वबळावर
सोलापूर : निधी मिळत नाही, मंत्री भेटत नाहीत, मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही भेटणे कठीण झाले. त्याची खंत जिल्हास्तरावरील जिल्हाप्रमुखांसह आमदारांमध्येही होती. त्यामुळे राज्यसभा व विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला ‘करेक्ट कार्यक्रम’ करता आला. त्यामुळे आता तिन्ही पक्षांनी सावध भूमिका घेत आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची तयारी सुरू केली असून, पुढील काही दिवसांत पदाधिकाऱ्यांसह आमदारांची बैठक होणार आहे.
हेही वाचा: सोलापूर पोलिसांची ‘सीएमआयएस’ प्रणाली! एका क्लिकवर समजणार गुन्हेगारांची कुंडली
सोलापूर महापालिकेत सध्या भाजपची एकहाती सत्ता होती. शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेस तिसऱ्या आणि एमआयएम चौथ्या क्रमांकावर होता. पण, पक्षातील अंतर्गत कुरघोडी आणि वरिष्ठांचे दुर्लक्ष, निधी मिळत नसल्याची खंत, अशा कारणांमुळे अनेक पदाधिकारी सध्या नाराज आहेत. दुसरीकडे, काँग्रेसमधील काही माजी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने पक्षात प्रवेश दिला आहे. राज्याच्या पातळीवर झालेली महाविकास आघाडी स्थानिक पातळीवर एकमेकांच्या विरोधातच काम करीत आहे. महापालिकेतील ११३ जागांवर तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे उमेदवार दिल्यास शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक जवळपास २२५ उमेदवारांची नाराजी ओढावणार आहे. त्या नाराजांना आपल्या पक्षात घेऊन भाजप उमेदवारी देऊ शकते. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, असे अनेकजण बंडखोरी करतील आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल, अशीही भीती आता वर्तविली जात आहे. त्यामुळे सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत आपल्या पदाधिकाऱ्यांना ‘स्वबळाची तयारी करा, कामाला लागा’ अशा सूचना केल्या आहेत.
हेही वाचा: विद्यापीठ घेणार एकाच दिवशी पाच पेपर! प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे क्रम उलटसुलट
जिल्हाप्रमुखांमध्येही नाराजीचा सूर
मागील नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपच्या तुलनेत शिवसेनेला खूपच कमी जागा मिळाल्या. अनेक ठिकाणी सभांसाठी गेल्यानंतर तेथील आजी-माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी विकासकामांसाठी आमदार निधी किंवा सरकारकडून निधी मिळवून देण्याची मागणी जिल्हाप्रमुखांकडे केली. पण, जिल्ह्यात शिवसेनेचा एकच आमदार (शहाजी पाटील) तेही सांगोल्याचे, पालकमंत्री राष्ट्रवादीचे आणि जिल्ह्यात सर्वाधिक आमदार भाजपचे. अशा परिस्थितीत निधी मिळत नसल्याची खंत काही जिल्हाप्रमुखांनी बोलून दाखविली होती.
हेही वाचा: मी पुन्हा येईन! राज्यसभा, विधान परिषदेनंतर आता सत्तापरिवर्तनाचा प्लॅन?
भाजपचे अस्तित्व नसलेल्या
मतदारसंघात टीका करायची कोणावर
जिल्ह्यातील मोहोळ, सांगोला, करमाळा, शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात भाजपपेक्षा महाविकास आघाडीतील उमेदवारांचेच तगडे आव्हान एकमेकांसमोर आहे. मोहोळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार यशवंत माने यांनी शिवसेनेचे नागनाथ क्षीरसागर यांचे तर करमाळ्यात अपक्ष आमदार संजय शिंदे यांना शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील व राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे आव्हान आहे. सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांना राष्ट्रवादी व शेकापचे आव्हान आहे. शहर मध्यमध्ये आमदार प्रणिती शिंदे यांना राष्ट्रवादी व शिवसेनेचा विरोध आहे. महाविकास आघाडीमुळे पुढील विधानसभा निवडणुकीत त्या ठिकाणी भाजपवर टीका करूनही त्या उमेदवारांना जास्त लाभ होणार नाही. त्यावेळी शिवसेना उमेदवारांना काँग्रेस, राष्ट्रवादीवरच बोलावे लागणार आहे. पण, तिन्ही पक्ष आघाडीत असल्याने त्यांची पंचाईत होणार आहे.
हेही वाचा: शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी
...महेश कोठे त्यामुळेच बाहेर पडले
काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर ‘मातोश्री’वर जाऊन महेश कोठे यांनी शिवबंधन बांधले. पक्षासाठी त्यांनी जीवाचे रान केले आणि कधी नव्हे तो शिवसेना महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांनी विकासकामांसाठी निधी आणून शिवसेनेचा महापौर करण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न केले. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे भेटून निधीची मागणी केली. मात्र, पक्षातील नेत्यांकडून दखल घेतली जात नसल्याच्या नाराजीमुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता ते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला
आमदार राऊत म्हणाले...
देवेंद्रजींनी तेव्हाच ठरविला होता कार्यक्रम
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी, महापूर, कोरोना अशा संकटात राज्यभर दौरे केले. अधिवेशनात विविध मुद्द्यांवर आक्रमक होऊन जनतेचे प्रश्न सोडविले. सत्ता नसल्याचे त्यांनी अडीच वर्षांत आमदारांना जाणवू दिले नाही. एखादे काम घेऊन गेल्यानंतर तत्काळ ते मार्गी लावत राहिले. राज्यसभेतील विजयानंतर विधान परिषदेला पाच उमेदवार भाजपने दिले. त्यातील पाचवी जागा विजयी झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करायचा, असे आमदारांच्या बैठकीतच ठरले होते. पण, ती बाब बाहेर येऊ दिली नाही, असे बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले.
Web Title: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीने महाविकासला धडा महापालिका झेडपीसाठी तिन्ही पक्ष
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..