शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

School
शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी

शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश! वेळेच्या अर्धा तास अगोदर शाळेत न येणारे शिक्षक बिनपगारी

सोलापूर : शाळेची वेळ सकाळी १० ते सायंकाळी साडेपाचपर्यंत असून, शनिवारी सकाळी आठ वाजता शाळा भरते. मात्र, शिक्षक वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होते. या पार्श्वभूमीवर आता सर्व शिक्षकांनी शाळा भरण्यापूर्वी अर्धा तास अगोदर शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक आहे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले आहेत. जे शिक्षक वेळेवर येणार नाहीत, त्यांना त्या दिवशीचा पगार मिळणार नाही, अशी कारवाई केली जाणार आहे.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

शाळेच्या वेळेत दुरून येणाऱ्या शिक्षकांना पोचता येत नसल्यास २४ जून २०१६ च्या शासन निर्णयाप्रमाणे त्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावे, असा नियम आहे. पण, परगावाहून येणारे बहुतेक शिक्षक गावात राहातच नाहीत. मागे अनेक शिक्षकांनी मुख्यालयात राहात असल्याचे प्रमाणपत्र दिले, पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळीच होती. आता मुख्यालयाच्या ठिकाणी राहण्याची सक्ती केली जाणार नाही, पण वेळेत शाळेत न येणाऱ्या शिक्षकांना त्या दिवशीचे वेतन मिळणार नाही. काही शाळांमध्ये शिक्षकांपेक्षाही अगोदर विद्यार्थी येतात, असे चित्र पाहायला मिळते. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवून जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रामाणिकपणे काम करणे अपेक्षित आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी लोहार म्हणाले. झेडपीच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर हातावरील पोट असलेल्यांचीच मुले असतात. त्यांची गुणवत्ता वाढवून त्यांना स्पर्धाक्षम बनविण्यासाठी प्रत्येक शाळाने तथा शिक्षकांनी वार्षिक नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. पेनूर (ता. मोहोळ) येथील जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये शनिवारी १६ शिक्षक शाळा भरल्यानंतर आले. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी आता नवे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती

शिक्षकांनी शाळेत वेळेवर उपस्थित राहणे अपेक्षित आहे. पण, अनेकजण शाळा भरल्यावर किंवा शाळा भरताना येतात. त्याचा बालमनावर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे आता शाळा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर सर्व शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहणे बंधनकारक असेल.
- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

हेही वाचा: तरूणांसाठी खुशखबर! महाविकास आघाडी करणार एक लाख पदांची मेगाभरती

शाळा व्यवस्थापन समित्यांचा असणार वॉच
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न असतात, पण कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी ज्यादा तासही घ्यावे लागतील. शिक्षक शाळेत वेळेवर येतात की नाही, अध्यापन करताना का, ते स्वत:च्या वैयक्तिक कामासाठी मोबाईल वापरतात का, यावर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी लक्ष द्यायला हवे. पण, शाळा व्यवस्थापन समित्यांनाही तो अधिकार असणार आहे. तक्रार आल्यानंतर चौकशी करून संबंधित शिक्षकांवर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Order Of The Education Officer Teachers Who Do Not Come To School Half An Hour Ahead Of Time Will Be Unpaid This Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top