राज्यात रेशनवर प्रति कुटुंब 1 किलो साखर - गिरीष बापट

Sugar
Sugar

नाशिक - राज्यात महिलांमधील लोह, आयोडीनचे प्रमाण कमी असल्याने रेशनकार्डावर लोह, आयोडीनयुक्त मीठ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्याचसोबत राज्यात यंदाही दिवाळीसाठी प्रति कुटुंब साधारण 1 किलो साखर दिली जाणार आहे. त्यासाठी 17 ते 18 कोटी खर्च अपेक्षित असून मंत्रिमंडळाच्या मान्यतेची औपचारिकता पूर्ण होताच, राज्यात लवकरच साखर वितरण सुरू होईल, अशी माहिती पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी दिली. बापट यांनी आज (ता.12) पुरवठा विभागाच्या अडचणीबाबत नाशिकच्या आमदारांची पुरवठा, अन्न-औषध भेसळ प्रतिबंधक विभागाची आढावा बैठक घेतली; तसेच त्यांच्या हस्ते आजपासून नाशिकला रेशनकार्डावर मिठाचे वाटप सुरू झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, राज्यात 33560 रेशन दुकाने आहेत. त्यातील 98 टक्के दुकानांना पॉस मशीन वाटपाचे काम पूर्ण झाले आहे. ऑनलाईन कामकाजामुळे पुरवठा विभागाच्या कामकाजात क्रांतिकारी बदल झाले आहे. आतापर्यंत 10 लाखांवर बोगस शिधापत्रिका रद्द झाल्या आहेत. त्यामुळे 3850 मेट्रिक टन धान्याची बचत झाली. काही तालुक्‍यांत कनेक्‍टिव्हीटीचा प्रश्‍न बाकी आहे. तेथे अपवाद म्हणून ऑफलाइन धान्य वितरण केले जाते. राज्यात 83 तर नाशिकला 68 टक्के शिधापत्रिका आधारकार्डाशी जोडल्या आहे. गुदामांवर लक्ष ठेवण्यासाठी 100 टक्के जीपीएस यंत्रणेचा वापर सुरू झाला आहे.

बर्फाचे कलर कोडीग देशात
राज्यात भेसळ प्रतिबंधाचा भाग म्हणून घरगुती व औद्योगिक वापराच्या बर्फासाठी अनुक्रमे पांढऱ्या व निळ्या रंगाचे कोडीग करण्याचा प्रयोग केला गेला. तो प्रयोग देशभर सुरू होणार आहे. राज्याचे हे यश आहे, असे सांगून त्यांनी उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रीवर नजर ठेवली जाणार आहे. एका महिन्यात भेसळमुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कायद्यात बदल केला जाणार आहे. तसेच नाबार्डच्या मदतीने राज्यात गुदाम कार्यक्रम राबविला जात असून त्यात, नाशिकला गुदाम बांधण्यासाठी 80 कोटी उपलब्ध होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com