मोठी बातमी! सोलापूर शहर- जिल्ह्यातील बेपत्ता १००९ महिला-मुलींचा शोध लागेना; जानेवारी २०२१ ते मार्च २०२४पर्यंतची स्थिती

मोबाईल व सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री, प्रेम आणि आणखी काही आमिष, यातून महिला- तरुणी, अल्पवयीन मुली पळून जाणे किंवा पळवून नेण्याचे, बेपत्ता होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
Missing Girl
Missing Girl esakal

सोलापूर : कोरोनानंतर दरवर्षी माहेरून पैसे आण म्हणून विवाहितांचा छळ होत असल्याच्या शेकडो तक्रारी पोलिसांत दाखल होत आहेत. दुसरीकडे मोबाईल व सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री, प्रेम आणि आणखी काही आमिष, यातून महिला- तरुणी, अल्पवयीन मुली पळून जाणे किंवा पळवून नेण्याचे, बेपत्ता होण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. शहर-ग्रामीणमधील १८ वर्षांवरील ४८७६ महिला तर ९०० अल्पवयीन मुली मागील साडेतीन वर्षांत बेपत्ता झाल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ९२७ महिला-तरुणी व ८२ अल्पवयीन मुली अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत.

घरात कोणी नसताना किंवा घरातील कोणालाही काहीही न सांगता रात्रीच्यावेळी किंवा दुपारी महिला, तरुणी, अल्पवयीन मुली घरातून बाहेर जातात. अनेकदा महाविद्यालयात गेलेल्या मुली पुन्हा घरी आलेल्या नाहीत. कुटुंबातील वातावरण, चुकीच्या मित्र-मैत्रिणींची संगत, सोशल मीडियातून अनोळखी व्यक्तीशी झालेली ओळख व त्याच्या अमिषात फसलेल्या महिला, तरुणी व अल्पवयीन मुलींचा त्यात समावेश आहे.

बेपत्ता तरुणी किंवा महिलांच्या नातेवाइकांनी पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिस सायबर पोलिसांच्या मदतीने त्यांचा शोध घेतात. दुसरीकडे १८ वर्षांखालील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यावर हा अपहरणाचा गुन्हा नोंद होतो. चार महिन्यात संबंधित पोलिस ठाण्यातून तपास न लागल्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या माध्यमातून त्यांचा शोध घेतला जातो. ग्रामीण पोलिसांच्या तुलनेत शहर पोलिसांची कामगिरी उत्तम असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. पण, ग्रामीण पोलिसांनीही अनेक बेपत्ता महिला, तरुणांसह अल्पवयीन मुलींचा यशस्वीपणे शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

१८ वर्षांवरील बेपत्ता महिलांची स्थिती

  • सन बेपत्ता महिला न सापडलेल्या

  • २०२१ १,३४७ ७३

  • २०२२ १,४९२ १५५

  • २०२३ १,५७८ ५४२

  • २०२४ ४५० १५७

  • एकूण ४,८७६ ९२७

१८ वर्षांखालील बेपत्ता मुलींची स्थिती

  • सन बेपत्ता अल्पवयीन मुली न सापडलेल्या

  • २०२१ २४२ ६

  • २०२२ ३०० १७

  • २०२३ २८६ ३०

  • २०२४ ९० २९

  • एकूण ९१८ ८२

बेपत्ता किंवा पळून जाण्यामागील प्रमुख कारणे

  • १) कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अडचणीची व कुटुंबातील सततची किरकिर

  • २) शिक्षणाऐवजी आई-वडिलांकडून मुलीकडे विवाहाचा तगादा

  • ३) समोरील व्यक्तीने दिलेला विश्वास, आधार, प्रेम व विवाहाचे आमिष

  • ४) सासरच्यांकडून किंवा माहेरील व्यक्तींकडून विवाहितांचा होणारा छळ

  • ५) पालक व तरुणांमधील विसंवाद व कुटुंबात होणारे सततचे वाद

कुटुंबात हवा सुसंवाद

कुटुंबात सुसंवाद हवा. प्रत्येक अडचणीवर उपाय असतोच, पण गैरसमजुतीतून पळून किंवा निघून जाणे हा त्यावरील पर्याय नाही. कुटुंबात काही मार्ग सापडत किंवा निघत नसल्यास पोलिसांचा भरोसा सेल मदतीसाठी आहेच. शहरातील बेपत्ता महिला, तरूणी, अल्पवयीन मुलींना शोधण्यात शहर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. त्यासाठी दरमहा विशेष मोहीम राबविण्यात आली.

- डॉ. दीपाली काळे, पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर

पोलिसांकडील माहितीनुसार...

  • सव्वातीन वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या ७० महिलांसह ९२७ जणींचा अद्याप शोध लागलेला नाही.

  • ग्रामीणमधील २११५ पुरुष २०२१पासून बेपत्ता आणि त्यातील ४१० अजूनही सापडले नाहीत.

  • २०२१ पासून शहरातील १८ अल्पवयीन मुली तर ८२ महिला, तरुणी पोलिसांना सापडल्या नाहीत.

  • ग्रामीणमधील ६४ अल्पवयीन मुली अजूनपर्यंत पोलिसांना सापडलेल्या नाहीत.

विसंवाद धोक्याचा, मुलांसोबत पालकांचा हवा सुसंवाद

घरातील वातावरण, चिडचिडेपणा, मित्र-मैत्रीणींची संगत, शारीरिक आकर्षण, समोरच्याकडून प्रेम व विवाहाचे आमिष, कुटुंबाची आर्थिक स्थिती हालाखीची, वय होऊनही आई-वडील विवाह करीत नाहीत, पसंतीच्या मुलासोबत विवाह करून न देणे किंवा जबरदस्तीने विवाह लावण्याचा घाट, अशा अनेक गोष्टी बेपत्ता होण्यामागे कारणीभूत आहेत. आता मोबाईलद्वारे मुली-महिलांशी चॅटिंग करून अनोळखी व्यक्ती त्यांना मोहजाळ्यात अडकवून पळवून नेत अल्याचीही वस्तुस्थिती आहे. अशावेळी शाळा, कॉलेजात मुलींचे समुपदेशन (कौन्सिलिंग) गरजेचे असून पालकांनीही वेळोवेळी मुलींच्या अडचणी जाणून घ्याव्यात. पालक व मुलांमध्ये सुसंवाद हवा. आपली मुले कुठे जातात, कोणाबरोबर असतात, याची माहिती पालकांना हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com