दहावी-बारावीची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा! दोन पेपरमध्ये असणार एक दिवसांची सुटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10th and 12th Students exam
दहावी-बारावीची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा! दोन पेपरमध्ये असणार एक दिवसांची सुटी

दहावी-बारावीची फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा! दोन पेपरमध्ये असणार एक दिवसांची सुटी

सोलापूर : दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. परीक्षा बोर्डाने वेळापत्रक निश्चित केले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार आहे.

कोरोनामुळे मागील वर्षी दहावी-बारावीची परीक्षा गावोगावच्या शाळा, महाविद्यालयात झाली. आता कोरोनाचा धोका टळल्याने विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीच्या परीक्षा केंद्रांवर होणार आहे. कोरोनामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देखील पारदर्शकपणे होऊ शकली नाही. निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद राहिल्याने अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्यात आली होती. आता संपूर्ण अभ्यासक्रमावर (१०० टक्के) परीक्षा होईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. परीक्षेचे अर्ज भरून झाले असून आता परीक्षेची तयारी युध्दपातळीवर सुरु झाली आहे. प्रश्नपत्रिका काढून त्याची छपाई करण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. जागतिक स्पर्धेत विद्यार्थी टिकावेत, यादृष्टीने कोरोनानंतरच्या या परीक्षेतून विद्यार्थ्यांची बौध्दिक पातळी पडताळणी होईल. बारावीची परीक्षा २१ फेब्रवारीपासून तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहे. परीक्षेनंतर निकाल वेळेत जाहीर करून विद्यार्थ्यांचा पुढील प्रवेशाचा मार्ग मोकळा करून दिला जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका परीक्षांपूर्वी किंवा परीक्षेनंतर होतील, असेही सांगितले जात आहे.

परीक्षेचे ठरले वेळापत्रक

दहावी-बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्चमध्ये होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी करून परीक्षेला सामोरे जावे. राज्यभरातील जवळपास ३१ लाख विद्यार्थी सहा हजार केंद्रांवर परीक्षा देतील.

- शरद गोसावी, अध्यक्ष, परीक्षा मंडळ, पुणे

परीक्षेसंदर्भात ठळक बाबी...

  • दहावी-बारावी परीक्षेसाठी राज्यात असतील सहा हजार परीक्षा केंद्रे

  • १ फेब्रुवारीपासून बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होईल

  • बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २ मार्चपासून सुरु होणार

  • दहावीची परीक्षा देतील १६.२७ लाख तर बारावीतील १४.४३ लाख विद्यार्थी

  • १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित असणार प्रश्नपत्रिका

दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी

कोरोनानंतर आता दहावी-बारावीतील विद्यार्थ्यांची पहिल्यांदाच पूर्वीप्रमाणे परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर परीक्षेचा तणाव येऊ नये, त्यांना अभ्यासाचे ओझे वाटू नये म्हणून दोन पेपरमध्ये एक दिवसाची सुटी दिली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बोर्डाने तयार केलेल्या सध्याच्या वेळापत्रकात थोडासा बदल होऊ शकतो. परीक्षेची सुरवात तर त्याचवेळी होईल, पण काही पेपरचे दिवस मागे-पुढे होतील, असेही बोर्डातील अधिकाऱ्यांनी सांगितले.