esakal | दहावी, बारावीचं त्रांगडं : परीक्षा लांबल्या ; विद्यार्थी, पालक नाराज

बोलून बातमी शोधा

10th, 12th Exams postphoned; Students, parents angry

दहावी आणि बारावीची मुले परीक्षेसाठी पूर्ण तयारीत होती. कसून सराव झाला होता. आताच परीक्षा झाली असती तर अडचण नव्हती. मात्र परीक्षा लांबल्याने मुले नाराज झाली आहेत

दहावी, बारावीचं त्रांगडं : परीक्षा लांबल्या ; विद्यार्थी, पालक नाराज
sakal_logo
By
अजित झळके

सांगली ः दहावी आणि बारावीची मुले परीक्षेसाठी पूर्ण तयारीत होती. कसून सराव झाला होता. आताच परीक्षा झाली असती तर अडचण नव्हती. मात्र परीक्षा लांबल्याने मुले नाराज झाली आहेत. त्याचा अभ्यासावर, सरावावर परिणाम होऊ नये, याची आता नव्याने काळजी घ्यावी लागेल. कोरोना संकट मोठे असल्याने पर्याय नाही, अशा भावना शिक्षक, पालकांनी "सकाळ' शी बोलताना व्यक्त केल्या. 

दहावी आणि बारावीची एप्रिल महिन्यात सुरु होणारी परिक्षा आता लांबणीवर पडली आहे. ती मे आणि जूनमध्ये होणार आहे. कोरोना संकट वाढत निघाले असताना हा निर्णय अनिवार्य होता, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. येथे पालक, विद्यार्थी, शिक्षण संस्थांनी मात्र निर्णयाचा सन्मान करताना विद्यार्थ्यांच्या नुकसानीची भिती व्यक्त केली आहे. 


शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे म्हणाले,""कोरोना संकटात विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहेच. मुलांची परीक्षांची मानसिकता तयार होती. त्यामुळे परीक्षा वेळेवर व्हाव्यात, अशी साधारण अपेक्षा होती. परंतू, संकट मोठे आहे. शासनाला निर्णय घ्यावा लागला. या स्थितीत मुलांचे समुपदेशन केले जाईल. त्यांच्यावर मानसिक दडपण येणार नाही, यासाठी सर्व ते करू.'' 


एरंडोली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. सी. पाटील म्हणाले,""मुले परीक्षेच्या मूडमध्ये होती. त्याला अडचण येतील. त्यामुळे त्यांना पुन्हा अभ्यासाला गती यायला वेळ लागेल. जून-जुलैमध्ये परीक्षा होणार म्हणजे अभ्यासात थोडी ढिलाई येऊ शकते. कारण, आताच झालेल्या सराव परीक्षांतून चांगला अभ्यास झाला होता. त्यावर परिणाम होऊ शकतो. पुन्हा नव्याने तयारी करून घ्यावी लागेल.'' 


पालक मानसी गोखले म्हणाल्या,""परीक्षा पुढे गेल्या ही बातमी आली त्यावेळी मला खरचं नकोसे वाटले. कारण, आधीच मुलांच्या शाळा खूप उशीरा सुरु झाल्या होत्या. आता परीक्षा पुढे ढकलल्या गेल्याने आणखी प्रश्‍न वाढणार आहेत. परीक्षा पुढे गेल्या म्हणजे निकाल, पुढचे प्रवेश साऱ्यावर परिणाम होणार आहेत. त्याची शासन काय तयारी करणार, हा प्रश्‍न आहेच. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. शिवाय, स्पर्धात्मक परीक्षा आणि करिअरच्या दृष्टीने विचार करताना काही अडचणी येतील का, याचीही भिती आहे. सध्याया मुलांचा अभ्यास झाला होता. सराव झाला होता. त्यांच्यासाठी पुन्हा नव्याने परीक्षेची मानसिकता बनवावी लागेल. ही बाब सहज नसते. ज्यांचा अभ्यास कमी होता, त्यांच्यासाठी ही संधी मानता येईल.'' 

संपादन : युवराज यादव