'जलयुक्त'साठी 11 हजार 494 गावांची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 मार्च 2017

3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध
मुंबई - राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध केल्याचे आदेश जलसंधारण विभागाने जारी केले आहेत.

3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध
मुंबई - राज्यात पुढील दोन वर्षांसाठी जलयुक्त अभियानात 11 हजार 494 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 3400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध केल्याचे आदेश जलसंधारण विभागाने जारी केले आहेत.

राज्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत 11 लाख 82 हजार 229 टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून 12 लाख 51 हजार 713 हेक्‍टर क्षेत्राला संरक्षित सिंचनाची क्षमता निर्माण झाली आहे, तर चार हजार 786 गावांमधील कामे पूर्ण झाली आहेत.

यासाठी राज्यात डिसेंबर 2014 पासून जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पाच वर्षांत राज्यातील 25 हजार गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानाचे यश लक्षात घेऊन चालू वर्षी हे अभियान पाच हजार 292 गावांमध्ये राबविण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. या वर्षी निवडण्यात आलेल्या गावांमध्ये कोकण विभागातील 136, नाशिक विभागातील 900, अमरावती विभागातील 998, पुणे विभागातील 825, औरंगाबाद विभागातील 1518, तर नागपूर विभागातील 915 गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये जलसंधारणाची 67 हजार 433 कामे सुरू असून त्यापैकी 45 हजार 163 कामे पूर्ण झाली आहेत, तर 22 हजार 280 कामे प्रगतिपथावर आहेत. या वर्षी जलयुक्त शिवार अभियानात शासकीय योजनेतून गाळ काढण्याची दोन हजार 215 कामे पूर्ण झाली असून या कामांच्या माध्यमातून 163.07 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे आणि 967.33 किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 86.17 कोटी रुपये आहे. तसेच, लोक सहभागातून गाळ काढण्याची दोन हजार 80 कामे पूर्ण झाली असून, या कामांच्या माध्यमातून 265.44 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला.

तसेच, 589.31 किलोमीटर लांबीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या कामांची किंमत 140.76 कोटी रुपये आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी या वर्षी 1400 कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जलयुक्त शिवार अभियानात या वर्षी तीन हजार 890 साखळी / सिमेंट नाला बांधांच्या कामांचा, तर 32 हजार 917 इतर कामांचा समावेश आहे. त्यापैकी आठ हजार 578 कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानात करण्यात आलेल्या कामांसाठी या दोन वर्षांत विशेष निधी आणि कन्व्हर्जन्समधून तीन हजार 946.14 कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. यामध्ये प्रत्यक्ष नागरिकांनी केलेली मदत, देवस्थान मंडळे, सामाजिक संस्था आणि कंपन्यांच्या मदतीचाही समावेश आहे.

निवडलेले विभाग आणि गावांची संख्या
- कोकण - 136
- नाशिक - 900
- अमरावती - 998
- पुणे - 825
- औरंगाबाद - 1518
- नागपूर - 915

अभियानातून...
- साडेबारा लाख हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण
- 4786 गावांमधील कामे 100 टक्के पूर्ण
- 11 लाख 82 हजार 229.48 टीएमसी पाण्याचा साठा

Web Title: 11,494 village selected for jalyukta shiwar