थकबाकीत 14 हजार कोटींची वाढ ; जिल्हा बॅंकांची कोंडी

तात्या लांडगे
रविवार, 30 सप्टेंबर 2018

कर्जमाफी जाहीर झाल्यापासून पुढील एका वर्षात सोलापूर जिल्हा बॅंकेची थकबाकी तब्बल 833 कोटी रुपयांनी वाढली. आम्हालाही मोदी सरकार कर्ज माफ करणार आहे, अशी उत्तरे संबंधित शेतकऱ्यांकडून दिली जातात. त्यामुळे तब्बल 60 हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. 

- किसन मोटे, सरव्यवस्थापक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंक  
 

सोलापूर : निवडणुकीपूर्वी मोदी सरकार आपलेही कर्ज माफ करेल, या आशेपोटी एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनीही बॅंकांचे कर्ज भरलेच नाही, त्याचा सर्वाधिक फटका पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्हा बॅंकांना बसला आहे. सद्यःस्थितीत राज्यातील 30 जिल्हा बॅंकांच्या थकबाकीत तब्बल 14 हजार कोटी रुपयांची वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

विदर्भ, मराठवाडा, कोकण विभागातील जिल्हा बॅंकांची थकबाकी कर्जमाफीमुळे कमी झाली. परंतु, वसुली सर्वाधिक असलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील नियमित कर्जदारांनी आपल्यालाही कर्जमाफी होईल, या आशेने कर्जच भरले नाही. आता शासनाने एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीतील थकबाकीदारांची माहिती मागविली आहे. त्यानुसार 24 सप्टेंबरपर्यंत माहिती देणे आवश्‍यक होते. मात्र, अकोला वगळता अन्य कोणत्याही जिल्ह्यांची माहिती प्राप्त झाली नसल्याचे सहकार आयुक्‍त कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

"ओटीएस'ची आज मुदत संपणार 

एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) मुदत जूननंतर सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली. परंतु, त्यासाठी पात्र असलेल्या कर्जदारांच्या याद्याच बॅंकांना प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे पैसे भरण्याची तयारी असूनही बहुतांशी कर्जदारांनी बॅंकांमध्ये पैसेच भरले नाहीत. आता या योजेनची उद्या (रविवारी) अंतिम मुदत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14 thousand crores in arrears District banks stopping