Vidhan Sabha 2019 : पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या : शरद पवार

Vidhan Sabha 2019 : पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांची आत्महत्या : शरद पवार

कर्जत-जामखेड : "भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या राजवटीत महाराष्ट्रातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यातून या सरकारचे शेतकऱ्यांविषयीचे धोरण कसे आहे, याचा अंदाज येतो. सुरू असलेले उद्योग बंद पडत असल्याने लोक बेरोजगार होत आहेत. म्हणजे नव्या पिढीला रोजगार मिळण्याची शक्‍यताच संपत आहे. त्यामुळे सध्याच्या महायुतीच्या सरकारला मते मागण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही,'' अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केली. 

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ कर्जतमध्ये आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. 

"रोहितच्या वयाचा असतानाच मी बारामतीमधून पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. त्या वेळी बारामती शहराची अवस्था सध्याच्या कर्जत-जामखेड मतदारसंघासारखीच होती. आता तेथील विकास पाहायला देशातून लोक येतात. बारामतीच्या धर्तीवरच कर्जत-जामखेडचा विकास होईल. रोहित पवार यांच्याकडून झालेला हा विकास पाहायला पुन्हा देशाचे पंतप्रधानच येथे येतील,'' असा विश्‍वासही पवार यांनी व्यक्त केला. 

येत्या 24 तारखेनंतर सर्वच माध्यमांत, "भाजपचा राम गेला' अशीच स्थिती कर्जत-जामखेडमध्ये होईल, असे सांगून पवार म्हणाले, "राज्याचे मुख्यमंत्री कुस्तीविषयी बोलतात. मी राज्यातील कुस्तीगीरांच्या तालीम संघाचा अध्यक्ष आहे. कुस्ती खेळायला प्रतिस्पर्धी उमेदवारदेखील तगडा लागतो. त्यातही कुस्ती कशी खेळतात, हे तुम्हाला येत्या 24 तारखेनंतरच समजेल.'' 

देशातील रोजगाराच्या मुद्द्यांवरही पवार यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, "जेट नावाच्या ज्या कंपनीची स्वत:ची 250 विमाने होती, ती कंपनी बंद पडली. त्यातून किमान 20 हजार नोकरदारांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला. आहे ते उद्योग सरकार वाचवू शकत नाही, मग नव्या पिढीला कोठून रोजगार देणार, असा प्रश्‍न पडतो. देशातील उद्योग बंद पडत आहेत. त्यातून वाढणारी बेरोजगारी चिंताजनक आहे. त्यामुळे या सरकारला पुन्हा मते मागण्याचा अधिकारच राहिलेला नाही.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com