राज्यातील धरणांत १७ टक्‍के साठा

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 मे 2019

दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील धरणांतील साठा कमी होत आहे. आजमितीस राज्यातील साठा १७ टक्‍के राहिला आहे.

मुंबई - दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, राज्यातील धरणांतील साठा कमी होत आहे. आजमितीस राज्यातील साठा १७ टक्‍के राहिला आहे. मराठवाड्यातील धरणांत जलसाठा अत्यंत कमी म्हणजे पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. अनेक धरणांची पातळी मृतसाठ्यांच्याही खाली गेली आहे. राज्यात उष्णता आग ओकत असल्यामुळे बाष्पीभवन वेगाने होत आहे. परिणामी, जलपातळी खालावतच चालली आहे.

राज्यात मोठे, मध्यम, लघू असे प्रकल्पांचे तीन प्रकार आहेत. हे प्रकल्प अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा महसूल विभागांत आहेत. यामध्ये मोठे प्रकल्प १४१, मध्यम प्रकल्प २५८ आणि लघू प्रकल्प ३८४ इतके आहेत. या प्रकल्पांतून शेती, उद्योग आणि पिण्याचे पाणी यासाठी वापर केला जातो. 

मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात तीव्र दुष्काळ असून, एकूण धरणांतील पाण्याचा साठा याच कालावधीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळजवळ निम्म्यावर आला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २९.५५ टक्‍के इतका पाणीसाठा होता. तो आता १७.४ टक्‍के इतका खाली आहे. राज्यात एकूण ३२६७ प्रकल्प आहेत.

मराठवाडा तहानलेला
राज्यातील मराठवाडा विभागात सर्व प्रकारच्या धरणांतील साठा रोडावला आहे. मोठ्या प्रकल्पांत केवळ २.६९ टक्‍के इतका, मध्यम प्रकल्पात ७.४२; तर लघू प्रकल्पात ८.९९ टक्‍के इतका साठा उपलब्ध आहे. या विभागात मृतसाठ्याखाली पातळी गेली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 17 percent water storage in dams in the state