राज्यात १८ जणांचा बुडून मृत्यू

पीटीआय
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

मध्य प्रदेशात ११ जणांचा मृत्यू
मध्य प्रदेश आणि दिल्लीतही गणेश विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांचा बुडून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी आज सांगितले. खतलापुरा घाट येथील तलावात विसर्जन करण्यासाठी काही भाविक दोन नावांमधून जात असताना त्या उलटून ११ जण बुडाले, तर सहा जणांना वाचविण्यात यश आल्याचे भोपाळचे जिल्हाधिकारी तरुण कुमार पिठोडे यांनी सांगितले. राजधानी दिल्लीतही सकाळी विसर्जनाच्या वेळी भाविक बुडाल्याची घटना घडली. दोन पुरुषांचे मृतदेह पल्ला भक्तावरपूर गावात आज पहाटे आढळले.

मुंबई - गणेश विसर्जनाच्या दिवशी गुरुवारी (ता. १२) राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून १८ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.

अमरावती, नाशिक, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धुळे, भंडारा, नांदेड, नगर, अकोला आणि सातारा या ११ जिल्ह्यांमध्ये वाहून गेल्याने १८ जणांचा मृत्यू झाला. यात अमरावतीमधील चार, रत्नागिरीतील तीन, नाशिक, सिंधुदुर्ग आणि साताऱ्यामधील प्रत्येकी दोन आणि ठाणे, धुळे, बुलडाणा, अकोला, भंडाऱ्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. ठाण्यात कल्पेश जाधव (वय १५) हा कसारा येथील मुलगा काल सकाळी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना वाहून गेला, अशा माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अमरावतीमधील वाटोळे शुक्‍लेश्‍वर गावातील पूर्णा नदीतून चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नाशिकमध्ये दोन जण वाहून गेले. गोदावरी नदीवरील रामकुंड येथून वाहून गेलेल्या प्रशांत पाटील (वय ३८) यांचा मृतदेह आढळला आहे. त्र्यंबकेश्‍वरमधील पहिणे गावातील तळ्यात बुडून युवराज राठोड (वय २८) या युवकाचा मृत्यू झाला. 

भंडाऱ्यातील डोलसर गावातील तलावातून सोमा शिवणकर याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. कऱ्हाडमधील कोयना नदीत मलकापूरचा चैतन्य शिंदे (वय २०) हा युवक वाहून गेला, तर अकोल्यात विकी मोरे (वय २७) हा पाण्याने भरलेल्या खाणीत विसर्जनासाठी गेला असताना बुडाल्याचे सांगण्यात आले. 

पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेले दोघे जण बुडाल्याची घटना घडली. यातील एकाला वाचवण्यात यश आले, तर जयवंत बाबू मोरे हा तरुण वाहून गेला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 People death by drown in ganpati visarjan