देशात उणे 19 टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा राज्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली असून, 16 राज्यांमध्ये कसातरी सरासरीचा आकडा गाठला आहे.

पंधरा राज्यांमध्ये जेमतेम हजेरी; अन्यत्र सरासरीइतकाच
पुणे - देशात पाऊस अद्यापही रुसलेलाच आहे. उत्तर भारतात सध्या पाऊस सुरू असला, तरीही पंजाब, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम आणि गोवा वगळता एकही राज्य पावसाबाबत "प्लस'मध्ये नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. देशातील पंधरा राज्यांमध्ये पावसाने जेमतेम हजेरी लावली असून, 16 राज्यांमध्ये कसातरी सरासरीचा आकडा गाठला आहे. देशात 1 जून ते 23 जुलैदरम्यान सरासरीच्या उणे 19 टक्के पाऊस पडल्याची नोंद खात्याच्या दफ्तरी झाल्याचे दिसते. दरम्यान, महाराष्ट्रात या हंगामात सरासरीच्या उणे 9 टक्के पाऊस झाला आहे.

कोकणात पावसाच्या सरी पडत असल्या, तरीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांत पावसाने गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे कोकणात सरासरीच्या तुलनेत 12 टक्के, तर मध्य महाराष्ट्रात आठ टक्‍के पाऊस पडला. मराठवाडा (-32 टक्के) आणि विदर्भात (-40 टक्के) पावसाने ओढ दिली आहे.

देशात गेल्या 73 दिवसांमध्ये उणे 19 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त सिक्कीम, मिझोराम व दादरा आणि नगर हवेली येथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. उर्वरित देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पावसाने ओढ दिल्याचे चित्र दिसत आहे.

पावसाचा अंदाज
24 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर विदर्भ, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची 25 ते 50 टक्के शक्‍यता.
25 व 26 जुलै - कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल, अशी 51 ते 75 टक्के शक्‍यता आहे.

पावसाचे प्रमाण
महाराष्ट्र -9
कर्नाटक -13
केरळ -27
गोवा 5
तमिळनाडू -31
आंध्र प्रदेश -21
तेलंगणा -33
ओरिसा -32
मध्य प्रदेश -15
गुजरात -43
राजस्थान -21
हरियाना 31
पंजाब 2
दिल्ली -64
उत्तराखंड -40
हिमाचल प्रदेश -41
जम्मू आणि काश्‍मीर -28
उत्तर प्रदेश -8
बिहार -1
झारखंड -45
छत्तीसगड -27
पश्‍चिम बंगाल -36
सिक्कीम 34
मेघालय -3
आसाम -1
त्रिपुरा 12
मिझोराम 26
मणिपूर -68
नागालॅंड -33
अरुणाचल प्रदेश - 5
(-19 ते 19 टक्के पाऊस म्हणजे सरासरी. -20 ते -59 टक्के म्हणजे पावसाने दिलेली ओढ.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 19 Percentage Less Rain in India