वीस हजार अवजड वाहने राज्यात परवान्यांच्या प्रतीक्षेत

प्रमोद सावंत
मंगळवार, 8 जानेवारी 2019

मालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने १५ मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटरच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणीची सक्ती केली आहे. मात्र, राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी २० हजार अवजड वाहनांचे परवाने गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. 

मालेगाव - केंद्रीय परिवहन मंत्रालयाने १५ मेपासून ट्रकसह त्या श्रेणीतील प्रवासी अवजड वाहनांसाठी वाहन चाचणीबरोबरच पाच किलोमीटरच्या ट्रॅकवरील इंधन अचूक वापर मोजमाप चाचणीची सक्ती केली आहे. मात्र, राज्यातील तीन जिल्हा कार्यालये वगळता इंधन चाचणी मोजमाप तपासणी यंत्राअभावी २० हजार अवजड वाहनांचे परवाने गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित आहेत. 

परिवहन मंत्रालयाने अवजड वाहन परवान्यांसाठी प्रशिक्षित चालक असावेत, अपघातांना आळा, इंधनाच्या योग्य वापरासाठी इंधन उपभोग चाचणी सक्तीची केली. या चाचणीसाठी एक दिवसाचे प्रशिक्षण व किमान पाच किलोमीटरचा ट्रॅक वा रस्ता असावा. पाच किलोमीटरच्या ट्रॅकमध्ये प्रत्येकी तीन उजवे-डावे वळण व तीन गतिरोधक असावेत. त्याच वेळी सुयोग्य चाचणी व कार्यक्षम इंधन वापर शक्‍य होईल. ही यशस्वी चाचणी देणाऱ्या उमेदवारालाच अवजड वाहन परवाना देण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

२७ नोव्हेंबरला राज्य परिवहन कार्यालयाने सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना इंधन वापर चाचणी मोजमापाकरिता बाजारात उपलब्ध असलेल्या उपकरणाची माहिती देणारे पत्र पाठविले. राज्यात प्रामुख्याने इन्टॅन्गल्स, आदिती व ऑटो कॉप या तीन कंपन्यांकडे हे यंत्र आहे. यंत्राची किंमत दर्जानुसार सुमारे ४० ते ५० हजार रुपये आहे. राज्यातील औरंगाबाद, कोल्हापूर व जळगाव या तीन जिल्ह्यांत महिन्यापूर्वी चाचणीकरिता वाहनाला हे यंत्र बसविण्यात आले. हे तीन जिल्हे वगळता अन्य कोठेही अवजड वाहन परवाने सध्या दिले जात नसल्याचे सांगण्यात आले. राज्यात ५० प्रादेशिक परिवहन कार्यालये आहेत. हे यंत्र नसल्याने तब्बल २० हजार परवान्यांची कामे प्रलंबित असल्याची माहिती विविध कार्यालयांशी संपर्काअंती समजली आहे.

मालेगाव ते दाभाडी हा पाच किलोमीटर रस्ता सुयोग्य ट्रॅक आहे. त्यावर प्रत्येकी तीन उजवे-डावे वळण व तीन गतिरोधक आहेत. मार्गाची परिवहन अधिकारी व ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी पाहणी केली आहे. शहरातील काही ड्रायव्हिंग स्कूलचालक इंधन चाचणी मोजमाप यंत्राबद्दल चौकशी करत आहेत. यंत्र येताच अवजड वाहन परवाने मिळू लागतील. 
- किरण बिडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव

Web Title: 20000 heavy Vehicle waiting for permission