सोयाबीनला २२ हजार कोटींचा दणका

सकाळ वृत्तसेवा
03.46 AM

मी ३० एकरांत सोयाबीन पेरले होते. गेल्या महिन्यात काढणीला सुरवात केली होती. पण, मोठा पाऊस झाला. आजही शेतात गुडघाभर चिखल आहे. त्यामुळे काढणीत अडचणी येत आहेत. सुमारे ४० ते ६० टक्के नुकसान झाले आहे. सोयाबीन सडून जात आहे. 
- नामदेव जाधव, मुसळेवाडी, ता. रेणापूर, जि. लातूर

पुणे - राज्यातील खरिपात दुसरे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनची यंदा पावसाने पूर्ण वाताहत केली. सोयाबीन पीक नेमके काढणीच्या अवस्थेत पावसाच्या तडाख्यात सापडल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. ६० टक्क्यांवर किमान नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे किमान २२ हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना हा सर्वांत मोठा फटका मानला जात आहे.

खरीप हंगामात राज्यात कोकण वगळता सर्वच विभागात सोयाबीन पीक घेतले जाते. कापसानंतर सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेले हे पीक यंदा सरासरीच्या तुलनेत १११ टक्के क्षेत्रावर पेरले गेले. राज्यात यंदा ३९ लाख ५९ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. 

सततचे ढगाळ हवामान, पावसाने सोयाबीन उत्पादकांचा उत्पादन खर्चात वाढ झाली. रोग-कीड नियंत्रणासाठी किमान दोन फवारण्या तरी कराव्या लागल्या आहेत. किमान १५ ते २० हजार रुपये प्रतिएकर उत्पादन खर्च झाला. पावसाने झोडपल्याने १० क्विंटल प्रतिएकर अशी उत्पादकात असलेल्या सोयाबीनचे नुकसान ६० ते ८० टक्क्यांपर्यंत झाले आहे.

नुकसानीचा अहवाल लांबण्याची शक्यता 
पुणे - राज्यात अतिपावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे अंतिम अहवाल अजून काही दिवस हाती येण्याची शक्यता नाही. आतापर्यंत नंदूरबार व भंडारा भागातील पीक पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र, क्षेत्रीय अहवाल पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारी सुटीच्या दिवशीदेखील काम करण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी आपापल्या पातळीवर घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अतिपावसामुळे राज्यातील ५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके नष्ट झाली असून खरीप हंगाम वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत अद्यापही सरकारी पातळीवरून कोणतीही धोरणात्मक घोषणा झालेली नाही. 

कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी विविध भागांचा स्वतः दौरा करून तसेच प्राथमिक माहितीच्या आधारे राज्य शासनाला एकूण नुकसान ५४ लाख हेक्टरच्या आसपास असल्याचे कळविले होते. मात्र, वस्तुस्थिती जाणून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

मात्र, अनेक भागांमध्ये वारंवार पाऊस व प्रत्यक्ष बांधावर जाण्यात येणारे अडथळे बघता अंतिम अहवाल लांबणीवर पडत आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरच्या आधी राज्यातील अंतिम नुकसानीचा अंतिम अहवाल तयार होण्याची शक्यता वाटत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 thousand crore soyabean loss