अफवा पसरवल्याप्रकरणी 257 गुन्हे 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक प्रमाण 

मुंबई : अफवा अथवा खोट्या बातम्या पसवरल्याप्रकरणी देशभरात 257 गुन्हे दाखल झाले आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) 2017 च्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. याबाबत मध्य प्रदेश (138), उत्तर प्रदेश (32) व केरळ (18) ही राज्ये आघाडीवर आहेत.

राज्यात याप्रकरणी केवळ 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. याशिवाय जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याप्रकरणी केवळ 4 गुन्हे दाखल झाले आहेत. भादंवि कलम 505 अंतर्गत याप्रकरणातील गुन्हे दाखल करण्यात आले असून एनसीआरबीच्या अहवालात प्रथमच या माहितीचा सहभाग करण्यात आला आहे.

11 राज्यांमध्ये याप्रकरणी एकही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यात झारखंड व हरियानासारख्या राज्यांचाही समावेश असून त्यात अफवा पसरवल्याप्रकरणी मारहाणीच्या घटनाही समोर आल्या होत्या. याशिवाय सात केंद्रशासित प्रदेशांपैकी सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये अफवा पसरवल्याप्रकरणी एकही गुन्हा दाखल नाही. त्यात दिल्लीचाही समावेश आहे.

देशातील महानगरांचा विचार केल्यास अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. मुंबईतही याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरांबाबत लखनौ देशात पहिल्या क्रमांकावर आहे. लखनौमध्ये अफवांबाबत 9 गुन्हे 2017 मध्ये दाखल झाले होते. देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये चेन्नईमध्ये सर्वाधिक म्हणजे 5 गुन्हे अफवांबद्दल दाखल झाले होते. 

अनेक प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेत 
अफवा पसरवल्याच्या गुन्ह्यांमध्ये एकाही अल्पवयीन मुलांचा समावेश नाही. 2017 च्या आकडेवारीनुसार अफवा पसरवल्याप्रकरणी 354 प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातील 168 प्रश्‍न 2017 पूर्वीची असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मोबाईल, इंटरनेट सुविधा यामुळे अफवा व बनावट बातम्या सहज पसरवणे सोपे झाले आहे. त्यामुळे कोणतीही पोस्ट पुढे पाठवण्याआधी त्याची खात्री करण्याची आवश्‍यकता असल्याचे नेहमीच पोलिसांकडून सांगण्यात येते. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 257 crimes for spreading rumors