26 वर्षीय जवान प्रथमेश कदम बचावकार्य करताना हुतात्मा

सुनील पाटकर
बुधवार, 16 मे 2018

प्रथमेशचे पार्थिव दिल्ली येथून आज रात्री उशिरा खास विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येणार असून, गुरूवारी सकाळी शेवते या त्याच्या गावी दाखल होईल. तसेच याच ठिकाणी सकाळी 9:00 वाजता हुतात्मा प्रथमेश याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महाड(रायगड) : महाड तालुक्यातील शेवते या दुर्गम गावचा जवान प्रथमेश दिलीप कदम याचा भोपाळमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातानंतर बचावकार्य करताना अचानक झालेल्या स्फोटात मृत्यू झाला. प्रथमेशच्या मृत्यूने महाडमध्ये शोककळा पसरली आहे.17 मेला या हुतात्मा जवानावर शेवते या गावी शासकीय इतमामात अत्यंसंस्कार होणार आहेत.

सैनिकी परंपरा असलेल्या या गावातील प्रथमेश कदम याच्या कुटुंबाची चौथी पीढी सध्या भारतीय लष्कराच्या सेवेत असून प्रथमेश कदम (वय 26 ) हा 2012 मध्ये सैन्यदलात भरती झाला होता. भोपाळ येथील ईएमई या सेंटरवर त्याची पोस्टिंग झाली होती.  

शनिवारी 12 मेला भोपाळ येथे घडलेल्या रेल्वेच्या अपघातानंतर बचावकार्य करणाऱ्या सैन्य दलाच्या पथकात प्रथमेश कार्यरत असतानाच रेल्वेमध्ये अचानक स्फोट झाला. त्यावेळी गंभीररित्या जखमी झालेल्या प्रथमेशवर दिल्लीतील सैन्य दलाच्या आरके मिल्ट्री हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु असताना मंगळवारी 15 मेला मृत्यू झाला.  

प्रथमेशचे मूळगाव महाड तालुक्यातील शेवते असून त्याचे वडील नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक झाले. त्यामुळे प्रथमेशचे शिक्षण हे नाशिकलाच झाले. मनमिळाऊ आणि दिसायला सुंदर असलेला प्रथमेश हा सर्वांचा लाडका होता. त्याच्या कुटुंबात आई, वडील आणि एक बहिण असा परिवार आहे. कुटुंबाकडून सध्या त्याच्या विवाहाबाबत प्रयत्न सुरु होते. परंतु त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

प्रथमेशचे पार्थिव दिल्ली येथून आज रात्री उशिरा खास विमानाने मुंबईमध्ये आणण्यात येणार असून, गुरूवारी सकाळी शेवते या त्याच्या गावी दाखल होईल. तसेच याच ठिकाणी सकाळी 9:00 वाजता हुतात्मा प्रथमेश याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आज दुपारी महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार चंद्रसेन पवार, निवासी नायब तहसीलदार दिपक कुडाळ यांनी शेवते गावात जाऊन कदम कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. 

Web Title: 26 years old Prathamesh Kadam Martyr in rescue Operation