मानधन रखडल्याने लोककलावंत अडचणीत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

राज्यातील सुमारे 30 हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही.

मुंबई - विधिमंडळाच्या मागील अधिवेशनात, फेब्रुवारीत आर्थिक तरतूद न केल्यामुळे राज्यातील सुमारे 30 हजार वयोवृद्ध लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळालेले नाही. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ही वेळ आली. ही चूक लक्षात आल्यावर सांस्कृतिक कार्य विभागाने अखेर या अधिवेशनात, जूनमध्ये 45 कोटी रुपयांची तरतूद केली. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात लेखानुदान सादर करण्यात आले होते. सर्व खात्यांनी नियमित योजनांसाठी आर्थिक तरतूद करून घेतली होती. परंतु, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने वयोवृद्ध लोककलावंतांच्या मानधनासाठी प्रस्तावच सादर केला नव्हता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यामुळे गरीब-गरजू लोककलावंतांचे मानधन पाच महिने रखडले. 

अशा स्थितीत अनेक वयोवृद्ध लोककलावंतांवर उपासमारीची वेळ आली असून, काहींना औषधोपचारांसाठी पुरेसे पैसे नसल्याची परिस्थिती आहे. ही समस्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या उशिरा लक्षात आली. त्यानंतर चालू अधिवेशनात लोककलावंतांच्या मानधनासाठी 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्यांना हे मानधन जुलैच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती सांस्कृतिक खात्यातील एका अधिकाऱ्याने दिली. 

मला दरमहा दीड हजार रुपये निवृत्ती वेतन मिळते; मात्र फेब्रुवारीपासून ही रक्कम मिळालीच नाही. संबंधित खात्याकडे वारंवार विचारणा केली, तरी उत्तर मिळत नाही. 
- बापू अंधारे, सोंगाड्या कलावंत 

माझे वय 65 वर्षे आहे. दीड हजार रुपये पेन्शन मिळते. मार्च महिन्यापासून ते मिळालेच नाही. दवापाण्याचा खर्च कसा भागावयाचा, हा प्रश्‍न पडला आहे. 
- भारतबाई अंधारे, लोकनृत्य कलावंत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 thousand veterans in the state have not received five months honorarium