मृत नक्षल्यांचा आकडा 37 वर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

मृत नक्षल्यांचा आकडा 37 वर पोहचला असून, कालच्या चकमकीत ठार झालेल्या 6 नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले आहेत. यामध्ये अहेरी दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे.

गडचिरोली : बोरिया जंगलात 16 नक्षल्यांचा खात्मा केल्यानंतर पोलिसांना घटनास्थळानजीकच्या नदीत नक्षल्यांचे आणखी 15 मृतदेह सापडले असून, राजाराम खांदला-नैनेर परिसरातील चकमकीत पुन्हा 6 नक्षल्यांना ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. अशाप्रकारे मृत नक्षल्यांचा आकडा 37 वर पोहचला असून, कालच्या चकमकीत ठार झालेल्या 6 नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोलीला आणण्यात आले आहेत. यामध्ये अहेरी दलम कमांडर नंदू उर्फ वासुदेव आत्राम याचाही समावेश आहे.

शनिवारी (ता. 21) रात्री सी-60 पथक व सीआरपीएफच्या क्रमांक 9 बटालियनचे पोलिसांनी ताडगावनजीकच्या बोरिया जंगलात नक्षल्यांना घेरले होते. दुसऱ्या दिवशी पहाटे झालेल्या चकमकीत 16 नक्षली ठार झाले. त्यात डीव्हीसी सिनू, त्याची पत्नी कमांडर शांता व पेरमिली दलम कमांडर तथा डीव्हीसी साईनाथ यांचा समावेश होता. त्यानंतर काल (ता. 23) घटनास्थळ परिसरात पोलिसांनी पाहणी केली असता इंद्रावती नदीच्या पात्रात आणखी 15 नक्षल्यांचे मृतदेह सापडल्याची माहिती आहे. तसेच काल रात्री अहेरी तालुक्‍यातील राजाराम खांदला-नैनेर परिसरात झालेल्या चकमकीत पुन्हा 6 नक्षली ठार झाले. यात दोन पुरुष व 4 महिला नक्षलींचा समावेश आहे. या चकमकीत डीव्हीसी वासुदेव आत्राम उर्फ नंदू, क्रांती (प्लाटून क्रमांक 7 ची सदस्य), कार्तिक उईके रा. कटेझरी (प्लाटून क्रमांक 7 चा सदस्य), जयशिला गावडे रा. बिनागुंडा (अहेरी एलओएस सदस्य) व लता वड्‌डे (अहेरी एलओएस सदस्य) हे ठार झाले आहे. एका महिला नक्षलीची ओळख अद्याप पटायची आहे.

ही कारवाई अहेरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ए.राजा व डॉ.हरी बालाजी यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या 6 नक्षल्यांचे मृतदेह आज सकाळी गडचिरोलीला आणण्यात आले असून या घटनेमुळे पोलिसांचे मनोबल उंचावले असून, आजपर्यंतच्या इतिहासात नक्षल्यांना सर्वांत मोठा धक्का बसला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी नक्षल चळवळीच्या इतिहासात मिळविलेले हे अभूतपूर्व यश आहे. दरम्यान, रविवारच्या चकमकीत ठार झालेल्या डीव्हीसी सिनूचे नातेवाईक आज सकाळी गडचिरोलीला पोहचले. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात सिनूचा मृतदेह ताब्यात घेतला.

आश्रम शाळेत शिकला डीव्हीसी नंदू
राजाराम खांदला-नैनेर परिसरात झालेल्या चकमकीत ठार झालेला डीव्हीसी नंदूचे मूळ नाव वासुदेव आत्राम असे असून, तो अहेरी तालुक्‍यातील अर्कापल्ली येथील रहिवासी होता. त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण पेरमिली येथील शासकीय उच्च आश्रमशाळेत घेतले. 2001-02 मध्ये बारावी विज्ञान शाखेत त्याने शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला होता. मात्र, त्यानंतर तो नक्षल चळवळीकडे आकृष्ट झाला. काल त्याला प्राण गमवावा लागला. अहेरी उप विभागात त्याची चांगलीच दहशद होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: 37 maoist killed in gadchiroli district