सोलापूरमधील ‘हे’ ४ ऑर्केस्ट्रा बार बंद होणार! एसपींनी पाठवले जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव; नव्या बारला परवाना नाहीच, जिल्ह्यात १२ बार सुरू, वाचा...

सोलापूर शहर हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहू शकतात. तर ग्रामीणच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहतील, असे नियम आहेत. तरीपण, काही मालक- चालक पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवतात.
solapur
ऑर्केस्ट्रा बार प्रकरणSakal
Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीणमधील मंद्रूप व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांनी नियमाला बगल देऊन बार चालविले. त्यामुळे त्यांचे परवाने रद्द करावेत, असे प्रस्ताव पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. दुसरीकडे, ग्रामीण पोलिसांनी आठ तर शहर पोलिसांनी तीन नव्या ऑर्केस्ट्रा बारला परवाना नाकारल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या ग्रामीणमध्ये पाच आणि शहर हद्दीत आठ ऑर्केस्ट्रा बार सुरू असल्याचेही सांगण्यात आले.

सोलापूर शहर हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू राहू शकतात. तर ग्रामीणच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार रात्री साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहतील, असे नियम आहेत. तरीपण, काही मालक- चालक पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ऑर्केस्ट्रा बार सुरू ठेवतात. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या विशेष पथकाने सहायक पोलिस निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वात मंद्रूप येथील ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकला होता. त्यानंतर त्यांनी संबंधित बारचा परवाना रद्दचा प्रस्ताव तयार केला आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला. आता दररोज रात्री ऑर्केस्ट्रा बारला अधिकारी भेटी देत आहेत. अनेकदा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे अधिकारी साध्या वेशात जाऊन खात्री करतात, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूर तालुका पोलिस ठाणे

  • (१) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परवानाधारक ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द करण्यासाठी चार ऑर्केस्ट्रा बारचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी त्या बारचे परवाने रद्द केले होते. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्या बार चालकांना पुन्हा परवाना मिळाला. त्यात नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील हॉटेल विजयराज, कोंडी येथील हॉटेल कॅसिनो व हॉटेल गॅलेक्सी आणि खेड येथील हॉटेल ॲपल हे बार आहेत.

  • (२) खेड (ता. उत्तर सोलापूर) येथे हॉटेल ॲपल या नवीन ऑर्केस्ट्रा बारसाठी दिलेला प्रस्ताव पोलिसांनी नाकारला. तसेच नंदूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील हॉटेल कोयल व हॉटेल रोनित, तांदूळवाडीजवळ (ता. दक्षिण सोलापूर) हॉटेल रिंकी गार्डन आणि भोगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील हॉटेल श्रद्धा या नवीन बारचे देखील परवाने नाकारल्याचे पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

  • (३) उच्च न्यायालयाच्या आदेशाने चालू असलेले मुळेगाव तांडा परिसरातील हॉटेल राजश्री या ऑर्केस्ट्रा बारवर २०२५ मध्ये व कोंडीतील हॉटेल कॅसिनो बारवर जानेवारी २०२६ मध्ये कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. त्यांचा परवाना रद्द करावा, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविल्याचेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

मंद्रूप पोलिस ठाणे...

(१) मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार चालकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दक्षिण सोलापुरातील कंदलगाव येथील हॉटेल पुष्पक आणि नांदणी येथील हॉटेल महाराजा या बारचा समावेश आहे. या ऑर्केस्ट्रा बार परवानाधारकांनी अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याने त्यांचे परवाने रद्द करावेत म्हणून पोलिस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यावर सध्या सुनावणी सुरू असून, त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण करू नये, त्यासाठी ग्रामीण पोलिसांनी नूतनीकरण चौकशी अहवाल देखील सादर केला आहे.

(२) मंद्रूप पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बसवनगर येथील हॉटेल बुरगुंडा, वडकबाळ येथील हॉटेल अभय ऑर्केस्ट्रा बार आणि औराद येथील हॉटेल गुत्तेदार ऑर्केस्ट्रा बार या नव्या ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिस अधीक्षकांनी परवाने नाकारले आहेत.

आमदार सुभाष देशमुखांचा अधिवेशनात प्रश्न अन्‌...

आमदार सुभाष देशमुख यांनी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील विशेषत: दक्षिण सोलापुरातील ऑर्केस्ट्रा बारचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून त्यांनी सुरु असलेल्या प्रत्येक ऑर्केस्ट्रा बारवर लक्ष ठेवले आहे. नियमाला बगल देऊन बार सुरु असल्याचे दिसल्यास थेट त्यांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले जातील, असे पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी देखील पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने तीन बारवर धाडी टाकून कारवाई केली आहे. मंद्रुप येथील बारवर कारवाई केल्यावर तेथील पोलिस ठाण्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षकांवर एक वर्षाची वेतनवाढ रोखण्याची कारवाई करून त्यांची बदली देखील केली आहे. आता तेथे सहायक पोलिस निरीक्षकांऐवजी पोलिस निरीक्षकांची नेमूणक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com