राज्यात 40 लाख हेक्‍टरचे विक्रमी सिंचन झाल्याचा दावा

संजय मिस्कीन
गुरुवार, 20 एप्रिल 2017

मुंबई - प्रत्यक्ष सिंचनाच्या आकडेवारीची झाकली मूठ सुटली असून, मागील वर्षात जलसंपदा विभागाने आजपर्यंतच्या इतिहासात विक्रमी सिंचन क्षेत्र वाढवल्याचा दावा केला आहे. आजपर्यंत राज्याचे सिंचन क्षेत्र कधीही 32 लाख हेक्‍टरच्या पुढे गेले नसल्याचे आकडेवारीवरून दिसत असताना यंदाच्या वर्षात मात्र राज्याचे प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 40 लाख हेक्‍टर इतके झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.

याबाबत, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता, अपुरे मनुष्यबळ असतानाही जलसंपदा विभागाने काटेकोर नियोजनामुळे हा विक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात मागील वर्षी उत्तम पाऊस झाल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झालेली होती. पाचही महामंडळांच्या क्षेत्रात जून 2016 मध्ये निर्मित सिंचन क्षेत्र 49 लाख 25 हजार हेक्‍टर होते, तर, 2016-17 मध्ये प्रत्यक्ष सिंचनाचे उद्दिष्ट 42 लाख 51 हजार हेक्‍टर इतके ठेवण्यात आले होते. यापूर्वी 2013-14 मध्ये सर्वाधिक 32 लाख 46 हजार हेक्‍टर इतके प्रत्यक्ष सिंचन झाले होते. मात्र, यंदाच्या चालू वर्षात यामध्ये विक्रमी वाढ होऊन प्रत्यक्ष सिंचन क्षेत्र 40 लाख हेक्‍टर इतके झाल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. यामधे खरीप व रब्बी हंगामात 37 लाख 22 हजार हेक्‍टर प्रत्यक्ष सिंचन झाले, तर सध्या उन्हाळ्यात उपलब्ध पाणीसाठ्यातून दोन लाख 80 हजार हेक्‍टरचे सिंचन होणार असल्याचे नियोजन केले आहे.

राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात प्रत्यक्ष सिंचनाची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता ही आकडेवारी समोर आली असून, राज्यात विक्रमी सिंचनाचे क्षेत्र वाढल्याचा दावा करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने ठरवलेल्या उद्दीष्टापैकी 94 टक्‍के सिंचन साध्य करण्यात यश मिळाल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Web Title: 40 lakh hecter irrigation in state