आता पुन्हा होणार वृक्षतोड; तब्बल पाच हजार झाडे तोडणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- 48 हजार रोपे लावणार असल्याचे महामंडळाकडून स्पष्ट

मुंबई : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर खालापूर ते कुसगावदरम्यान दोन टप्प्यांत बांधण्यात येणाऱ्या बोगद्यासाठी तब्बल पाच हजार झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात येणार आहे. ही झाडे कापल्यानंतर नव्याने 48 हजार झाडे लावण्यात येणार असल्याचे राज्य रस्ते विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे द्रुतगती मार्गावरील घाट क्षेत्रातील कोंडी कमी होणार असून, या मार्गावरील प्रवासाची वेळ 25 मिनिटांनी कमी होणार आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

केबल स्टेड ब्रिजच्या मदतीने हे बोगदे एकमेकांना जोडले जाणार आहेत. या संपूर्ण कामासाठी 83 हेक्‍टर जमिनीवरील सुमारे साडेपाच हजार वृक्ष तोडावे लागणार आहेत. या कामासाठी पर्यावरण खात्याची परवानगी मिळाली आहे; परंतु उच्च न्यायालयाने वृक्षतोडीबाबत प्रलंबित असलेल्या एका याचिकेदरम्यान पायाभूत सुविधा उभारताना पर्यावरणाची हानी करून चालणार नाही, असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यामुळे या निरीक्षणाचा आदर करत 48 हजार झाडे लावण्याचा निर्णय "एमएसआरडीसी'ने घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. काही झाडे औरंगाबाद क्षेत्रात; तर काही मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग परिसरात लावण्यात येणार आहेत. 

पर्यावरण विभागाने परवानगी देताना नव्याने लावण्यात येणाऱ्या झाडांची पाच वर्षे देखभाल करण्याची अट घातली आहे. तसेच, ज्या जमिनीवर "एमएसआरडीसी' झाडे लावणार ती वन खात्याच्या अखत्यारीतच हवी, असेही नमूद करण्यात आले आहे.

देशातील सर्वांत मोठा बोगदा 

मार्चपासून खोपोली ते कुसगावपर्यंतच्या मिसिंग लिंकचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत देशातील सर्वांत मोठ्या बोगद्याचे काम सुरू आहे. हे मिसिंग लिंकचे काम तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे एक लाख 80 हजार वाहने प्रत्येक दिवशी या मार्गाने प्रवास करतील असा अंदाज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 5 Thousand tree will be cut for Highway