esakal | राज्यात ५१ वैद्यकीय महाविद्यालये ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणार

बोलून बातमी शोधा

concentrator oxygen plant
राज्यात ५१ वैद्यकीय महाविद्यालये ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होणार
sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे - कोरोनामुळे ऑक्सिजनचा सध्या निर्माण झालेला तुटवडा लक्षात घेता त्यावर कायमचा उपाय शोधण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या रुग्णालयांच्या आवारातच आता ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्लँट निर्माण करण्याचा केंद्र सरकारने आदेश दिला आहे. त्यामुळे देशातील ६१९ तर राज्यातील ५२ वैद्यकीय महाविद्यालये ऑक्सिजनबाबत सहा महिन्यांत स्वयंपूर्ण होतील. अनेक महाविद्यालयांनी या बाबतची प्रक्रिया सुरू केली आहे.

कोरोनामुळे अनेक राज्यांत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे औद्योगिक वापराचा ऑक्सिजनही रुग्णालयाकडे वळविला जात आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल मिशनने (एनएमसी) दोन दिवसांपूर्वीच आदेश काढून शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी त्यांच्या रुग्णालयाच्या आवारात लिक्विड ऑक्सिजनसाठी टॅंक उभारून सेंट्रल लाईनद्वारे प्रत्येक बेडपर्यंत ऑक्सिजन पोचविण्याचा आदेश दिला आहे. त्याला बॅकअप म्हणून आणि आपत्तीच्या वेळेला ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून रुग्णालयाच्या आवारातही ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्लांट उभारायचा आहे. यासाठी ‘एनएमसी’ने सहा महिन्यांची मुदत दिली आहे. अनेक महाविद्यालयांत लिक्विड ऑक्सिजनच्या साठवणुकीसाठी सध्या टॅंक आहेत आणि त्याचा बेडपर्यंत पुरवठा करण्यासाठी सेंट्रल लाइनही आहे. लिक्विड ऑक्सिजनचा खासगी कंपन्यांकडून टॅंकरद्वारे पुरवठा होतो. मात्र, भविष्यात रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आता ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर प्लँट महाविद्यालयांच्या आवारातील रुग्णालयांत उभारण्याचा आदेश एनएमसीने दिला आहे. पुण्यातील भारती हॉस्पिटल, सिंबायोसिस आणि डि. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयांनी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर प्लँट उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा: Pune Corona Update: कालच्यापेक्षा आज अधिक रुग्ण; दगावणाऱ्यांची संख्याही वाढली

ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्लांट म्हणजे काय ?

आजाराच्या प्राथमिक अवस्थेत रुग्णाला अतिरिक्त ऑक्‍सिजनची गरज भासल्यास व्हेंटिलेटरला पर्याय म्हणून हे उपकरण वापरता येते. पॉलिमर मेंब्रेनमूळे ऑक्‍सिजनचे वाढलेल्या प्रमाणाबरोबरच शुद्ध हवा श्‍वासोच्छवासासाठी उपयोगी पडते. हवेतील ऑक्सिजन शोषून आवश्यक त्या घटकांतून रूपांतर करून रुग्णाला दिला जातो. उच्च दाबावर हवा प्रवाहित केल्यामुळे मेंम्ब्रेनमधून फक्त ऑक्‍सिजन आणि त्यासमान आकाराचे अणूंचे संकलन होते, हवेतील धुलिकण, विषाणू आदी कारक घटकांचे प्रमाण घटल्यामुळे रुग्णाला शुद्ध हवा मिळते.

ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्लांट आम्ही लवकरच उभारणार आहोत. त्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे लवकरच हा प्लांट तयार होईल.

- डॉ. पी. डी. पाटील (अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटी)

एमएमसीने बंधनकारक करण्यापूर्वीच आम्ही ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्लांट उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या ८ दिवसांत सांगली आणि पुण्यातील आमच्या शाखेत त्याचे काम सुरू होईल.

- डॉ. संजय ललवानी (वैद्यकीय संचालक भारती हॉस्पिटल)

ऑक्सिजनची सध्याची परिस्थिती पाहता ऑक्सिजन कॉन्सट्रेंटर प्लांट उभारण्यासाठी आम्ही या पूर्वीच ठरविले आहे. त्याबाबतचे काम सुरू आहे.

- डॉ. विद्या येरवडेकर (डॉ. प्रधान संचालक, सिंबायोसिस सोसायटी)