अवघड आहे? 6 महिन्यांत संपले उजनी धरणातील 54 TMC पाणी! धरण उणे 40 टक्क्यांवर; सोलापूर शहराचा पाणीपुरवठा होणार आता 5 दिवसाआड

6 महिन्यांत उजनीतील 54 टीएमसी पाणी संपले. सध्या 15 दिवसाला धरणातील पावणेदोन टीएमसी पाणी संपत आहे. दुसरीकडे सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळ गाठत आहे. त्यातील पाणी 30 मेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा 5 दिवसाआड केला जाणार आहे.
ujani dam
ujani damsakal

सोलापूर : सहा महिन्यांत उजनी धरणातील तब्बल ५४ टीएमसी पाणी संपले असून सध्या १५ दिवसाला धरणातील पावणेदोन टीएमसी पाणी संपत आहे. दुसरीकडे सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा तळ गाठत आहे. त्यातील पाणी ३० मेपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण सोलापूर शहराचा पाणीपुरवठा पाच दिवसाआड केला जाणार आहे.

पावसाळा संपल्यावर १७ ऑक्टोबरला उजनीत ९६ टीएमसी (६०.३८ टक्के) पाणी होते, पण आता धरणातील साठा उणे ४० टक्क्यावर आहे. यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण ६६ टक्क्यांपर्यंत भरले होते, पण तीन महिन्यात सलग तीनवेळा पाणी सोडल्याने धरणाने उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठला होता. २१ जानेवारीला उजनी उणे झाले आणि आता तीन महिन्यात धरण उणे ४० टक्के झाले आहे. धरणावर पाणीपुरवठ्याच्या ४२ योजना अवलंबून आहेत. त्यातील सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते आणि वर्षातून तीनवेळा विशेषत: उन्हाळ्यात ते पाणी सोडले जाते.

कडक उन्हाळ्यात नदीतून पाणी सोडताना सात टीएमसीपर्यंत पाणी सोडावे लागते. आता आणखी दोन महिने उन्हाळा असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरवातीला नव्हे तर परतीचा पाऊस पडतो अशी आजवरील स्थिती आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीद्वारे औजमध्ये पाणी सोडण्याऐवजी रे नगर व एनटीपीसीच्या माध्यमातून ७० एमएलडी पाणी शहरासाठी घेता येईल का, या पर्यायाची देखील महापालिकेकडून चाचपणी सुरु आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होऊ नये, हा त्यामागील हेतू आहे.

वाळू काढण्याच्या परवानगीसाठी महापालिकेचे ‘जलसंपदा’ला पत्र

औज, चिंचपूर बंधाऱ्यातील गाळ व वाळू काढण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून जॅकवेलजवळ (पंपहाऊस) पाणी साठवण क्षमता वाढेल आणि बंधाऱ्यातील पाणी पुढे काही दिवस पुरवता येईल, असे पत्र महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे. त्या पत्रानुसार जिल्हा खनिकर्म विभागाची मान्यता बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय गाळ किंवा वाळू काढता येणार नाही. पण, बंधाऱ्यातील गाळ व वाळू काढल्यास आठ दिवस पाणी पुरवता येईल, असेही महापालिकेने पत्रातून कळविले आहे.

उजनीत मे महिन्यात तिबार पंपिंग होणार

औज बंधाऱ्यातील पाणी १५ ते ३० मेपर्यंत पुरविण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी बंधाऱ्यातील जॅकवेलजवळील गाळ व वाळू काढण्याची परवानगी जलसंपदा विभागाकडे मागितली आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी १५ मे दरम्यान उजनी धरणात तिबार पंपिंग सुरू करण्याचे नियोजन आहे.

- व्यंकटेश चौबे, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सोलापूर महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com