
तात्या लांडगे
सोलापूर : शरणु हांडे या तरुणाचे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता सोलपुरातून अपहरण झाले. ५.३० वाजता पोलिसांना खबर मिळाली. पोलिसांनी तातडीने चार पथके बनवून चार दिशांना धाडली. चारही दिशांचे टोल नाके तपासणे सुरू झाले, यात वेळ जात होता. रात्रीचे ८ वाजत होते, अपहरणकर्ते लांब अंतरावर जात होते, तेवढ्यात ध्यानात आले की गाडी कर्नाटकातील इंडीच्या दिशेने गेलीय. गाडीच्या क्रमांकावरून समजले की गाडी कम्युनिकेशन क्षेत्रातील एका कंपनीची असून त्याला ‘जीपीएस’ आहे. ती पुण्यातून संशयित आरोपींनी भाड्याने घेतलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधला, पुण्यातील अंमलदार व्यवस्थापकाकडे पाठविला.
गाडीला जीपीएस असल्याने रात्री साडेआठच्या सुमारास गाडी ट्रेस झाली. त्यावेळी अपहरणकर्त्यांची गाडी आणि सोलापूर पोलिस यांच्यात ७० किलोमीटरचे अंतर होते. दरम्यान, अपहरणकर्ते काहीतरी खाण्यासाठी वाटेत २० ते २५ मिनिटे थांबले. त्यावेळी त्यांनी शरणूला मारहाण देखील केली. तो वेळ पोलिसांच्या पथ्यावर पडला.
पोलिसांना अपहरणकर्त्यांचे लाइव लोकेशन कळत होते. पोलिस आणि अपहरणकर्ते यांच्या गाडीतील अंतर आता अवघे दीड किलोमीटर इतकेच राहिले होते. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी पुण्यातील त्या कंपनी व्यवस्थापकास अपहरणकर्त्यांची गाडी लॉक करण्यास सांगितले. सुरुवातीला अपहरणकर्त्यांना आपली गाडी पुढे का जात नाहीय, हे समजलेच नाही. ते खाली उतरून गाडी ढकलण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हढ्यात सोलापूर पोलिस तेथे पोचले. चारपैकी तिघांनाा पाठलाग करून तर एकाला कारजवळच पकडले. हा सर्व थरार एकूण साडेचार ते पाच तासांचा होता. सोलापूर पोलिसांनी अद्भूत काम केलं. आधुनिक तंत्राचा वापर भन्नाट पद्धतीने केला आणि गुन्हेगारीच्या तपासात इतिहास रचला.
अक्कलकोट रोडवरील साई नगरातील शरणु शिवराय हांडे (वय ३६) या तरुणाचे अपहरण करणाऱ्या चारचाकी गाडीत कोयता, लोखंडी रॉड, हॉकी स्टीक यासह आक्षेपार्ह वस्तूही सापडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी आपल्याला केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलकेल्याचा बदला तसाच घेण्यासाठी शरणूचे अपहरण केल्याची बाब प्राथमिक तपासात समोर आली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरातून गुरूवारी सायंकाळी पाचच्या सुमारास शरणु हांडे याचे अपहरण झाले होते. शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांनी तातडीनेत्यांच्या नेटवर्कचा वापर केला. पुण्यातील ज्या कंपनीची गाडी संशयित आरोपींनी ६ ते १२ ऑगस्टपर्यंत भाड्याने घेतली होती, त्या कंपनीच्या व्यवस्थापकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तो कॉल घेत नव्हता आणि पोलिसांकडे तेवढा वेळही नव्हता. त्यामुळे त्या परिसरातील पोलिस ठाण्याशी संपर्क साधून एक अंमलदार त्या व्यवस्थापकाच्या घरी पाठवून गाडीची माहिती दिली. त्यानंतर गाडीला असलेल्या ‘जीपीएस’वरून पोलिसांनी त्याच्याकडून माहिती मिळविली. पोलिसांना आता गाडीचा रस्ता, लोकेशन सगळे दिसत होते. त्यांनी गाडीचा अचूक पाठलाग केला आणि इंडीजवळील होर्ती गावाजवळ गाडी पकडली.
पोलिसांनी ‘या’ चौघांना केली अटक
जीवे ठार मारण्याच्याउद्देशाने अपहरण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी अमित म्हाळप्पा सुरवसे(वय २९, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड), सुनील भीमाशंकर पुजारी (वय २०,रा. साईबाबा चौक, सोलापूर), दीपक जयराम मेश्राम (वय २३, रा. लोकमंगल हॉस्पिटलजवळ,आशा नगर) व अभिषेक गणेश माने (वय २३, रा. एकतानगर, सोलापूर) यांना अटक केली आहे. आणखी दोन संशयितांचा शोध सुरू आहे.
संशयित आरोपींचा असा होता प्लॅन...
घराजवळून गाडीत घालून नेलेल्या शरणू हांडे याची टक्कल करून त्याला साडी नेसवायची. त्याच्यावर सर्वांनी मिळून क्रूर कृत्य करायचे आणि प्रत्येकाने त्याचा व्हिडिओ काढायचा व तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा संशयित आरोपींचा प्लॅन होता. पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये खोबरेल तेलाची बाटली, साडी, लवंगी फटाक्यांचा बॉक्स, दाढी करायचा ट्रीमर आणि निरोधाचे पाकीट आढळले आहे. त्याचा वापर ते त्यासाठीच करणार होते आणि तसे त्यांनी पकडल्यावर पोलिसांना सांगितलेसुद्धा आहे. दरम्यान, त्या वस्तू संशयितांनी नेमक्या कशासाठी सोबत बाळगल्या, याचा सखोल तपास सुरू असल्याचे एमआयडीसी पोलिसांनी सांगितले.
अमित सुरवसे पोलिसांना म्हणाला, ‘जरा उशिरा पकडायला पाहिजे होते’
संशयित आरोपींना पकडण्यासाठीपोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चार पथके तयार केली होती. त्यातील दोन पथकांनी इंडीजवळील होर्ती गावाजवळ ते वाहन टप्प्यात आणले. त्यानंतर पुण्यातील कंपनीला संपर्क करून ही गाडी लॉक करायला सांगितली आणि गाडी जागेवर थांबली. गाडीतून उतरून पळून जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी तातडीने पकडले. त्यावेळी अमित सुरवसे म्हणाला, ‘साहेब, आम्हाला पकडले काही वाटले नाही, तुम्ही पकडणार हे माहितीच होते, पण थोडे उशिरा पकडायला पाहिजे होते. पकडलो गेल्यापेक्षा आमचे काम अर्धवटराहिले याचे दु:ख वाटते’, त्याने माझी समाजात खूप बदनामी केली आहे’.
पाय बांधून सीटाखाली टाकले होते
शरणू हांडे याला गाडीत टाकल्यानंतर पहिल्यांदा पाय बांधून त्याला चालकाच्या मागील सीटाखालीटाकले होते. त्याला मारहाण देखील करण्यात आली होती. पोलिसांनी गाडी पकडल्यावर शरणूयाला बाहेर काढून तेथील दवाखान्यात नेऊन उपचार करून सोलापुरात आणले. संशयितांनाही सोलापूरमध्ये आणले.
तीन महिन्यांपूर्वीच ठरला होता प्लॅन
शरणू हांडे याने मे २०२५ मध्ये त्याच्या सहकाऱ्यांसमवेत अमित सुरवसे व अन्य एकाला बेदम मारहाण केली होती.त्याचा व्हिडिओ काढून सोशल मिडियावर प्रसारित केला होता. त्याचवेळी सुरवसे याने बदला घेण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्याने मित्रांची मदत घेऊन गुरूवारी (ता. ७) शरणूचे अपहरण केले. मात्र, त्यांचा प्लॅन पोलिसांमुळे पूर्ण होऊ शकला नाही. शरणू हांडेला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे व्हिडिओ काढून सोशल मिडियावर टाकण्याचा त्यांचा प्लॅनहोता, असे सूत्रांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.